अरविंद केजरीवाल यांना तिहारमध्ये ठेवणार; ‘अशी’ असेल दिनचर्या

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने धक्का दिला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कोर्टाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. सोमवारी ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्याची तयारी सुरू आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या 2 नंबरच्या बराकीत ठेवण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया 1 नंबरच्या बराकीत आहेत. सत्येंद्र जैन 7 नंबरच्या तर संजय सिंह 5 नंबरच्या बराकीत आहेत. केजरीवाल तिहार तुरुंगात जाणारे आपचे चौथे नेते आहेत. भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता महिला विभागाच्या बराक 6 मध्ये आहेत. केजरीवाल 15 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांना तिहारमध्ये पाठवल्यावर त्यांना कैद्यांप्रमाणे दिनचर्या स्विकारावी लागेल. कैद्यांचा दिवस सकाळी 6:30 वाजता सुरू होतो. त्यांना नाश्ता म्हणून चहा आणि काही ब्रेड देण्यात येतात. सकाळच्या आंघोळीनंतर सुनावणी असल्यास केजरीवाल न्यायालयात जातील. सुनावणी नसेल तेव्हा कायदे तज्ज्ञांसह सल्लामसलत करू शकतील. त्यांना दुपारचे जेवण सकाळी 10:30 ते 11 च्या दरम्यान मिळेल. त्यात डाळ, भाजी आणि पाच पोळ्या किंवा भात असेल. जेवण झाल्यावर कैद्यांना दुपारी ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या कोठडीत बंद ठेवण्यात येते. दुपारी 3:30 वाजता त्यांना चहा आणि दोन बिस्किटे मिळतात. दुपारी 4 वाजता ते त्यांच्या वकिलांना भेटू शकतात. रात्रीचे जेवण संध्याकाळी 5:30 वाजता मिळेल. त्यात सकाळीच्या जेवणाप्रमाणेच पदार्थ असतील. पोळी नको असल्यास भात देण्यात येतो. त्यानंतर कैद्यांना रात्री 7 पर्यंत बंद केले जाते.

केजरीवाल यांना टीव्ही बघण्याची परवानगी मिळाली आहे. ते बातम्या, मनोरंजन आणि खेळांसह 18 ते 20 वाहिन्यांचे प्रसारण बघू शकतात. आपत्कालीन परिस्थितीसाठी 24 तास डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित असतील. केजरीवाल मधुमेहाचे रुग्ण असल्याने तुरुंगवासाच्या काळात त्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे. केजरीवाल यांच्या प्रकृतीचा विचार करता केजरीवाल यांच्यासाठी विशेष आहाराची विनंती करण्यात आली होती. ते आठवड्यातून दोनदा कुटुंबातील सदस्यांना भेटू शकतात. केजरीवाल यांना रामायण, श्रीमद भगवद गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ हे पुस्तक सोबत घेण्याची परवानगी मागितली आहे.