लोकसभेच्या रणधुमाळीत केजरीवाल रामायण वाचणार; ‘या’ गोष्टींची केली मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने धक्का दिला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कोर्टाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. सोमवारी ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ईडीची ही मागणी कोर्टाने मंजूर केली आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात काही गोष्टी सोबत घेण्याची परवानगी मागितली आहे.

केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्याची तयारी सुरू आहे. त्यांना तुरुंगातल्या कोणत्या विभागातील कोणत्या बराकीत ठेवले जाणार, याबाबत ईडीचे अधिकारी, तुरुंग व्यवस्थापन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. केजरीवाल यांनी तुरुंगात त्यांच्याजवळ भगवद्‌गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी मागितली. तसेच ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ हे पुस्तकदेखील त्यांना त्यांच्याजवळ हवं आहे.

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या या देशातील महाभारताच्या रणधुमाळीत केजरीवाल तुरुंगात राहणार असून या 15 दिवसात ते रामायण, महाभारत या ग्रंथासह ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ हे पुस्तक वाचणार आहेत. तसेच त्यांनी तुरुंगवासाच्या काळात एक धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली आहे. तसेच त्यांची नियमित औषधे आणि विशेष डाएट पुरवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.