पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; काँग्रेसचा हल्लाबोल

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन रविवारी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी प्रकृती अस्वास्थामुळे शनिवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी राष्ट्रपतींचा पंतप्रधान मोदींकडून अपमान झाल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांना केला आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पंतप्रधान मोदी यांच्याकडून राष्ट्रपतींचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत. पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. ही पहिली वेळ नाही, नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपती दिसल्या नाहीत. या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते, अशी पोस्ट काँग्रेसने केली आहे.

देशाच्या प्रथम नागरिकाचा म्हणजेच राष्ट्रपतींचा आदर सर्वांत महत्त्वाचे असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली, त्यावेळी भाजपाने त्यांच्या आदिवासी या समाजाचा हा सन्मान असल्याचं भासवलं होतं. पण आजचा फोटो बघितल्यावर मनात विचार आला, की भाजप नेमका सन्मान करतंय की अवमान?, असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.