AI मुळे न्यायालयीन कामकाजात फायदा होईल पण आव्हानेही निर्माण होतील; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

सध्याचे युग हे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. एआय या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सहज शक्य होतात. तसेच कामाचा झपाटाही वाढतो. एआयचा वापर आता सर्वच क्षेत्रात करण्यात येत आहे. माहितीच्या महाजालातून आपल्याला हवी त्या पद्धतीची माहिती एआयच्या मदतीने मिळते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात एआयचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, मात्र त्यासोबतच अनेक आव्हानेही समोर उभी ठाकतील, असा इशारा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी दिला. हिंदुस्थान आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीश बोलत होते.

न्यायालयीन कामकाजात एआयचा वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीची आव्हाने निर्माण होतील. त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे चंद्रचूड म्हणाले. कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. मात्र, एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीची आव्हानेही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावर मात करूनच आपल्याला पुढे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

हे तंत्रज्ञान असल्याने एआयकडून चुका होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती मिळू शकते. त्यावर विसंबून राहिल्यास संवेदनशील प्रकरणात अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या क्षेत्रात एआयचा वापर करण्यापूर्वी गांभीर्याने विचार करावा लागेल. तसेच यामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि समस्या यावर उपाय शोधावे लागतील, असेही चंद्रचूड यांनी सांगितले.

तांत्रिक विकासासाठी आणि अचूक माहितीसाठी एआयचा वापर गरजेचा ठरणार आहे. मात्र, त्यामुळे न्यायनिवाडा प्रक्रियेत आव्हाने उभी राहू शकतात. एआयचा वापर प्रशासकीय कार्यक्षमतेपुरता मर्यादित नसून कायदेशीर संशोधन आणि न्यायिक विचारमंथनातही प्रवेश केला आहे. अनेक ठिकाणी निष्कर्षांचा विचार न करता न्यायिक निर्णयामध्ये एआयचा वापर होत आहे. त्यामुळे आता या तंत्रज्ञानच्या वापराबाबत योग्य विचार करून निर्णय घेण्याची गरज चंद्रचूड यांनी व्यक्त केली.