पुन्हा गुजरातच! पोरबंदरच्या किनाऱ्यावर 3300 किलो ड्रग्ज! पाच पाकिस्तानींना अटक

गुजरात एटीएस, नौदल आणि एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीजवळ भर समुद्रात एका जहाजातून तब्बल 3 हजार 300 किलोचा ड्रग्जचा साठा पकडण्यात आला. या कारवाईत जहाजातील 5 परदेशी पेडलर्स म्हणजेच ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली असून ड्रग्जचा आजवरचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात आल्याचे तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अमली पदार्थांमध्ये 3 हजार 3089 किलो चरस, 158 किलो क्रिस्टल मेथाम्फेटामाईन आणि 25 किलो हेरॉईन यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अटक करण्यात आलेले ड्रग्ज तस्कर पाकिस्तानी नागरिक  असल्याचा संशय आहे. दरम्यान, या कारवाईमुळे हिंदुस्थान अमली पदार्थमुक्त करण्याच्या मोदी सरकारच्या निर्धाराचा पुरता फज्जा उडाल्याचेच समोर आले आहे.

नोंदणी नसलेले एक जहाज गुजरात समुद्रकिनाऱ्याच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ 60 नॉटीकल मैलावर दिसले. त्यानंतर नौदलाने भर समुद्रात शोधमोहीम राबवली. नौदलाने जहाजावरील पाचही ड्रग्ज तस्करांना मंगळवारी पकडल्यानंतर त्यांना तपास यंत्रणांच्या हवाली करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातच्या किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार विविध प्रकारे गस्त घालून भर समुद्रात शोधमोहीम राबवण्यात आली. एका जहाजातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय नौदलाच्या अधिकाऱ्यांना होता. अलिकडच्या काळात इतक्या मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थ पहिल्यांदाच पकडल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी एक्सवरून दिली आहे. या अमली पदार्थांची नेमकी किंमत उघड करण्यात आली नाही.

हेरॉईनच्या पाकिटांवर पाकिस्तानी पंपनीचे नाव

ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रग्जपैकी 25 हेरॉईनच्या पाकिटांवर रास आवाड गुड्स पंपनी, प्रोडय़ूस ऑफ पाकिस्तान असा स्टॅम्प होता, अशी माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पाच दिवसांपूर्वी 350 कोटींचे हेरॉईन पकडले

पाच दिवसांपूर्वी वेरावळ बंदरातून एका मासेमारी बोटीतून 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. अमली पदार्थांच्या या साठय़ासोबतच 9 जणांना अटक करण्यात आली होती. विविध तपास यंत्रणा याचा सखोल तपास करत आहेत.

या कारवाईसाठी नौदलाने लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान, एक युद्धनौका आणि हॅलीकॉप्टर्सचा वापर केला, असे नौदलाने म्हटले आहे.

या अमली पदार्थांची किंमत 1 हजार 300 ते 2 हजार कोटींपर्यंत आहे, अशी माहिती एनसीबीचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ड्रग्ज तस्करांकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र सापडले नाही. मात्र त्यांच्याकडे सॅटेलाईट पह्न आणि मोबाईल सापडल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक ग्यानेश्वर सिंग यांनी सांगितले.

तरीही मोदी सरकारने पाठ थोपटून घेतली 

गुजरातमध्ये हजारो किलो ड्रग्ज मिळाले असताना पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईबद्दल पाठ थोपटून घेतली. पंतप्रधान  मोदी यांच्या ड्रग्ज फ्री हिंदुस्थान या व्हीजनसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.