भाजप-मिंधेंच्या संसारात अजित पवारांची एंट्री; अनेकांचे मंत्रीपदाचे स्वप्न धुळीस, मिंधेंच्या गोटात रडारड

राज्यातील मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. आपल्यालाच मंत्रीपद मिळणार, असे काहीजण छातीठोकपणे सांगत होते. तर काहीजण मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार लाँबिंग करत होते. तसेच मंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटातील धूसफूसही उघड झाली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपद यामुळे राज्यातील वातावरण तापले होते. त्यातच रविवारी राजकीय उलथापालथ झाल्याने आता सर्व राजकीय समीकरणे बदललेली आहेत.

शिंदे- फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण शिंदे गटावर आरोप करत होते. शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रत्यारोप होत होते. मिंधे सरकार महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या अनेक जनहिताच्या योजनांना स्थगिती देत असल्याने अनेक कामे रखडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता.

नाशिक- नांदगावमध्ये सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद शिगेला गेला होता. भुजबळांमुळे अनेक कामे होत नाहीत, असा आरोप कांदे यांनी केला होता. आता भूजबळ यांनाही मंत्रिपद मिळाल्याने आता सरकारमध्ये हे काम कसे करणार आणि नांदगावमधील रखडलेली कामे आता तरीमार्गी लागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार निधी अडवत असल्याने अनेक कामे रखडल्याचा आरोप शिंदे गटातील काहीजण करत होते. आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने आता त्यांनी केलेल्या आरोपाचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. रविवारी झालेल्या या घडामोडींमुळे आता अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. तसेच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करणारे मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे आता परत सरकारमध्येच आरोप-प्रत्यरोपांचे राजकारण सुरू होणार का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.