राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आमचेच! अजित पवार यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार यांच्या गटातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात आला. तसेच अनेक संघटनात्मक नियुक्त्याही करण्यात आल्या. आम्ही महायुतीचे सरकार चांगल्याप्रकारे चालवून दाखवू, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. तसेच आम्ही घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताचा असल्याचेही सांगण्यात आले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आता पक्षात संघटनात्मकदृष्ट्या नियुक्त्या करण्याची तयारी आम्ही केली आहे. शपथविधीनंतर आम्ही काही संघटनात्मक निर्णय घेतले.

कार्यकारी अध्यक्ष होण्याआधी आपण उपाध्यक्ष म्हणून काहीजणांची नियुक्ती केली होती. जयंत पाटील यांच्याकडे आम्ही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. आता आपण त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांच्या जागेवर आम्ही सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत. जंयत पाटील यांनी या पदाची सूत्रे तटकरे यांच्या सोपवावीत, असे पत्र पाटील यांना आम्ही पाठवले आहे. इतर संघटनात्मक नियुक्ती करण्याचे अधिकार तटकरे यांना देण्यात येत आहेत, असे पटेल यांनी सांगितले.

काही जणांनी निवडणूक आयोगाकडे तर विधानसभा अधअयक्षांकडे अपात्र ठरवण्याची तक्रार केली आहे. मात्र, कोणाच्याही अपात्रतेची कारवाई पक्षाकडून होऊ शकत नाही. निवडणूक आयोगही त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. याबाबतचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतात. त्याची प्रक्रिया झाल्याशिवाय कोणालाही अपात्र ठरवता येत नाही, असेही पटेल यांनी सांगितले. अजित पवार हे पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारत आहे. प्रतोद यांची नियुक्ती पक्षाकडून होत असते. आम्ही अनिल भाईदास पाटील यांना प्रतोदपदी कायम ठेवले आहे, याबाबत आपण विधानसभआ अध्यक्षांना कळवले आहे. याबाबतची अधिकृत प्रक्रिया आम्ही केली आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्याबाबत ते माहिती देतील, असे अजित पवार यांनी सांगितले. एका विरोधी पक्षनेत्याला प्रतोद म्हणून निवडण्यात आले आहे. मात्र, विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे.जो पक्ष विरोधी पक्षातील सर्वाधीक संख्या असणाऱ्या पक्षातील विरोधीपक्षेता निवडण्यात येतो. मात्र, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा संभ्रम वाढवण्यासाठी अशा गोष्टी करण्यात येत आहेत.मात्र, अशा गोष्टींना काहीही अर्थ नाही. बहुसंख्य आमदार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आमच्याबरोबर आहेत. आम्ही सर्व एकत्र येत राज्याच्या भल्यासाठी काम करत आहोत. या पुढेही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी काम करणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करत आहे. त्यालाही आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच केंद्राकडून राज्याला निधी आणि परवानग्या लागतात, त्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्रात आणि राज्यात वेगळ्या विचारांचे सरकार असेल, अशा राज्यांमध्ये निधीसाठी कमतरता जाणवते. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताचाच निर्णय घेतला आहे. काहीजणांनी आमच्या 9 जणांना नोटीस काढली आहे. मात्र, नोटीस काढण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे. हे सर्व करत असताना आमच्यासोबत असलेल्या आमदारांचे भवितव्य सुरक्षित कसे राहिल, त्यांना घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही, याची खबरदारी आम्ही सर्वजण घेत आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता आपली प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. आता पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधअयक्षपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच प्रवक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे, सूरज चव्हाण हे आमच्या पक्षाची भूमिका मांडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच आहेत. काहीजणांनी आम्ही कायद्यात न जाता जनतेमध्ये जाऊ, असे विधान केले आहे.मात्र, त्यानंतर रात्री उशीरा पत्रकार परिषद घेत वेगळ्या घटना आणि गोष्टी सांगण्यात येत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य, चांगली, रास्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या हिताची आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड पक्षाच्या कार्यकारिणीने केली आहे. त्यांची नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार फक्त कार्यकारिणीलाच आहे. मात्र, तोपर्यंत पटेल हे त्या पदावरच आहेत. मात्र, राज्यातील प्रश्न बघता, आम्ही त्यात लक्ष घालत ते सोडवण्यास सुरुवात केली आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करण्याचा प्रश्न नाही. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी, बेरजेच्या राजकारणासाठी काम करत आहोत. आम्ही कोणचाही हकालपट्टी करण्यासाठी पक्षाचे काम हाती घेतला नाही. आम्ही कोणाचीही हकालपट्टी करणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. राज्याच्या हितासाठी आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने महायुतीचे सरकार चांगेल चालवू, असे आश्वासन आम्ही देतो. कोणाल बंड वाटेल कोणाला काय वाटेल याला अर्थ नाही. याबाबत कायदा आणि संस्था आहेत. त्यांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. हे आपण पाहिले आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. आमच्या 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करावी, असे काही जणांनी म्हटले आहे. आपण पक्षाचे विधिमंडळ नेते असल्याने आपण जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी घेतलेले निर्णय आम्हाला लागू नाहीत. कारण पक्षातील बहुसंख्य नेते, आमदार, खासदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचे निर्णय आम्हाला लागू नाहीत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. याबाबत कोणताही वाद होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, वाद निर्माण झाल्यास निवडणूक आयोग यांचा निर्णय अंतिम असेल. आम्हीच पक्ष असल्याने जी पक्षांची संख्या आहे, तीच आमची संख्या आहेत. आता जे दावा करत आहेत, त्यांनी त्यांची संख्या सांगावी, असेही पटेल म्हणाले. पक्षाचे बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भावना शरद पवार यांनी समजून घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना करत आहोत.

शरद पवार आमचे गुरु आहेत. आज गुरुपोर्णिमा आहेत, त्यांचे आशिर्वाद आम्हाला आहे, असे भुजबळ म्हणाले. आमच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री झाला. पक्ष सत्तेवर आला. आता आमदारांना निधी मिळणार. अनेक कामे होणार, हीच गुरदक्षिणा आम्ही त्यांना दिली आहे, असेही ते म्हणाले.