मुंबईकर सौरभ वालकर न्यूझीलंडचा ऍनालिस्ट

हिंदुस्थानात होणाऱया आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार करत आहेत, पण न्यूझीलंडने मुंबईच्या रणजी संघाचा परफॉर्मन्स ऍनालिस्ट सौरभ वालकरला वर्ल्ड कपसाठी ऍनालिस्ट म्हणून करारबद्ध केले आहे. हिंदुस्थानी खेळपट्टय़ांचा अभ्यास करण्यासाठी न्यूझीलंडला वालकरची चांगलीच मदत होणार, यात शंका नाही.

5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया वर्ल्ड कपच्या दहा स्टेडियममधील खेळपट्टय़ांचा अभ्यास सर्वच संघांनी सुरू केला आहे. पण यात आघाडी घेतली आहे न्यूझीलंडने.आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवरच हिंदुस्थानातील खेळपट्टय़ांचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यानुसार रणनीती आखण्यासाठी न्यूझीलंडने वालकरची ऍनालिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे. वालकर हा न्यूझीलंड संघाबरोबर 30 ऑगस्टपासून पहिला दौरा करणार आहे. न्यूझीलंड हा इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार असून या मालिकेत वालकर हा किवी संघाबरोबर दिसणार आहे. सध्या तो द हंड्रेड स्पर्धेत मँचेस्टर ओरिजनल्ससाठी काम करत आहे.

अनुभवाचा होईल फायदा

परफॉर्मन्स ऍनालिस्ट म्हणून वालकरला चांगला अनुभव आहे. त्याने मुंबई संघासोबत आठ वर्षे काम केले आहे. त्याने 2006 मध्ये शिक्षण सोडले. मग त्याने एका वर्षाचा बायो मॅकेनिक्सचा कोर्स केला. त्याला 2007 मध्ये मुंबई संघात व्यंकटेश गुरुमूर्ती यांचा सहाय्यक परफॉर्मन्स ऍनालिस्टची संधी मिळाली.