संसद ठप्पच कामकाज सोमवारपर्यंत तहकूब 

मणिपूरच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे, ही मागणी विरोधकांनी आजही लावून धरल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाज होऊ शकले नाही. गोंधळाची मालिका दोन्ही सभागृहांत कायम राहिल्याने कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन मणिपूर मणिपूर  अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. 

राज्यसभेत सभापती आणि ब्रायन यांच्यात खडाजंगी

राज्यसभेत आजही मणिपूरचाच विषय गाजला. सभापती जगदीप धनखड व तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. सभापतींनी या तणावपूर्ण वातावरणातच कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.