कोरोनावर मात… आता जास्त अंगमेहनत केल्यास हार्ट अटॅकचा धोका!

कोरोना काळात एकदम फिट असणारेही आडवे झाले होते. कोरोनातून बरे झालेल्यांनी फिट राहण्यासाठी पुन्हा व्यायाम सुरू केला. तुम्हीही जीममध्ये प्रचंड घाम गाळत असाल तर सावधान… कारण कोरोनातून उठलेल्यांनी जर कठोर परिश्रम केले तर त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आयसीएमआरच्या हवाल्याने म्हटले आहे. गुजरातमध्ये गरबा खेळताना अवघ्या 24 तासांत 10 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. त्यानंतर आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कारणे शोधली.

नवरात्रोत्सवात गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांना हृदयरोगतज्ञांसमवेत बैठक घ्यावी लागली होती. हार्ट अटॅक का येत आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी काय करावे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास तज्ञांना सांगण्यात आले होते. त्यानंतर आयसीएमआरने याबाबत सखोल अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार केला. या अहवालानुसार जे कोविडमुळे गंभीर आजारी होते त्यांनी कठोर व्यायाम करणे, वजन उचलणे किंवा कठोर परिश्रम करणे टाळावे असे आयसीएमआरने म्हटले आहे.

किमान दोन वर्षे अंगमेहनत करू नका
कोरोनातून बरे झालेल्यांनी किमान दोन वर्षे तरी अंगमेहनत करू नये, असे आयसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे. मार्निंग वॉकला गेल्यानंतर छाती फुटेस्तोवर धावणे, मोठे वजन उचलून बायसेप मारणे, मांडय़ा दुखेस्तोवर जोरबैठका मारणे असे कठोर परिश्रम टाळण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

युवक, तरुण आणि मध्यमवयीनांनाही धोका
गरबा खेळताना हार्ट अटॅक येणाऱ्यांमध्ये तरुण आणि मध्यमवयीनांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे आढळले. यंदाच्या नवरात्रीत गरबा खेळताना मृत्यू झालेल्यांमध्ये गुजरातमधील बारावीत शिकणाऱ्या वीर शाह तसेच अहमदाबादचा 28 वर्षीय रवी पांचाल आणि वडोदरातील 55 वर्षीय शंकर राणा यांचाही समावेश होता. हार्ट अॅटॅकने मरणाऱ्यांच्या एकामागोमाग एक घटना घडू लागल्यानंतर गुजरातच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि एक वैद्यकीय पथक तैनात करणे अनिवार्य असल्याची अधिसूचना काढली होती.