ट्रायलमध्ये टॉप, तरी दीपा कर्माकरला वगळले

रियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिलेली जिम्नास्ट दीपा कर्माकर हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आले आहे. ट्रायलमध्ये टॉप केल्यानंतरही तिला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या जागेवर प्रणती नायक व प्रणती दास यांना आर्टिस्टिक जिम्नास्टिकच्या हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे.

जिम्नास्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (जीएफआय) दीपा कर्माकर हिचे नाव पाठविले होते, मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मंजुरी मिळण्यापूर्वीच हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) तिचे नाव कापले. दीपाने प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे तिला आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले, अशी माहिती ‘जीएफआय’ने दिली. दीपा ही दुखापत व डोपिंगमध्ये सापडल्यामुळे 2019पासून स्पर्धेत सहभागी झालेली नाहीये. फेब्रुवारी 2023 मध्ये ती डोपिंगमध्ये नापास झाली होती. 10 जुलै 2023 पर्यंत तिच्यावर बंदी होती.

आशियाई स्पर्धेसाठी दीपाचाच हक्क

‘दीपा कर्माकरने ट्रायलमध्ये टॉप केलेले आहे. तीच आशियाई स्पर्धेसाठी हक्कदार होती. आम्ही पाठविलेल्या यादीत दीपाचे नाव अव्वल स्थानी होते, मात्र आमच्याशी कुठलीही चर्चा न करता तिला वगळण्यात आले आहे.’

सुधील मित्तल (अध्यक्ष, जीएफआय)