साय-फाय -झेप चांद्रयानाची

>> प्रसाद ताम्हणकर

हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ‘चांद्रयान-3’ला यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्यात आलेले यश होय. करोडो हिंदुस्थानी या घटनेकडे डोळे लावून बसले होते. हिंदुस्थानच्या शिरपेचात या मोहिमेने एक मानाचा तुरा रोवला आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा हिंदुस्थान हा जगातला पहिला देश बनला आहे. ‘चांद्रयान-2’च्या अपयशानंतर खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ज्या प्रकारे पुन्हा नियोजन करून, मागच्या चुकांवरून शिकत ही नवी मोहीम आखली आणि फत्ते केली त्याला तोड नाही. यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यावर ‘चांद्रयान-3’ने देशवासीयांसाठी आपला पहिला संदेशदेखील पाठवला आहे.

हिंदुस्थानच्या आधी रशियाचे यान चंद्रावर उतरणार होते. मात्र रशियाची ही मोहीम पूर्णपणे फसली आणि हिंदुस्थानची धडधड वाढली, पण जे रशियाला जमले नाही ते इस्रोने करून दाखवले आहे. कोणत्याही ग्रहावर एखादा उपग्रह पाठवण्यात सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे उपग्रहाने त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणे. चंद्रावर उपग्रह पाठवण्यात सुरुवातीला अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तादेखील 14 वेळा अपयशी ठरल्या होत्या. 15 व्या मोहिमेत त्यांना यश मिळाले. याउलट हिंदुस्थानने आपल्या ‘चांद्रयान-1’ या पहिल्याच मोहिमेत हे यश साध्य केले होते. इस्रोची भरारी त्यावेळी जी चालू झाली, ती आता थेट चंद्रावर उतरण्यापर्यंत पोहोचली आहे.

‘चांद्रयान-2’ मोहिमेत इस्रोने ऑर्बिटरसह प्रज्ञान रोव्हर आणि पाम हे लॅंडर पाठवले होते. मात्र ‘चांद्रयान-2’ चंद्रावर कोसळले. असे असले तरी त्याचे ऑर्बिटर हे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालते आहे. त्याचाच अत्यंत खुबीने वापर करत इस्रोने यावेळी फक्त लॅंडर आणि रोव्हर पाठवले. त्यामुळे आता ‘चांद्रयान-3’चा लॅंडर पाम हा ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटरचा वापर पृथ्वीबरोबर संवाद साधण्यासाठी करेल. प्रज्ञान रोव्हरने गोळा केलेला डाटा तो पामकडे पोहोचवले आणि पाम तो सर्व डाटा ऑर्बिटरच्या माध्यमातून पृथ्वीवर पोहोचवेल.

‘चांद्रयान-3’च्या प्रपल्शन मोडय़ूलमध्ये स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लेनेटरी अर्थ (एप्Aझ्ं) जोडण्यात आले आहे. हे उपकरणदेखील त्याच्यासोबत चंद्राभोवती फिरत राहणार आहे आणि आजूबाजूच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारे निरीक्षण करून तिथल्या जीवसृष्टीचा शोध घेण्याचे कार्य पार पाडेल. पृथ्वीप्रमाणे चंद्रावरदेखील भूकंप होत असतात. इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सिस्मिक अॅक्टिविटी हे उपकरण चंद्रावरील भूकंपाचा अभ्यास करणार आहे. रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फियर हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. तेथील प्लाझ्माची घनता तपासणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स व आयग्नची पातळी आणि त्यात होत जाणारे बदल यांचा अभ्यास करणार आहे. या सर्व उपकरणांना कार्यरत राहण्यासाठी विजेची गरज भासणार आहे. त्यासाठी ‘चांद्रयान-3’मध्ये बॅटरीच्या जोडीला सोलर पॅनेलचीदेखील जोड देण्यात आलेली आहे.

‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या पृष्ठभागावर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याची माहिती आपण भविष्यात घेत राहणार आहोत. पण हिंदुस्थानच्या या अभूतपूर्व यशानंतर आता ‘चांद्रयान-4’ मोहिमेत भविष्यात इस्रो मानवाला चंद्रावर उतरवणार का? या चर्चेने जोर पकडला आहे. चांद्रयान मोहिमांच्या मागे इस्रोचे ते लक्ष्य नक्कीच आहे. मात्र सध्या इस्रोकडे असलेले कोणतेही रॉकेट किंवा इंजिन त्या क्षमतेचे नाही. त्यामुळे इस्रो आपल्या ध्येयाकडे छोटी छोटी पावले टाकत प्रगती करत आहे. ‘चांद्रयान-1’मध्ये ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब पाठवण्यात आले होते. ‘चांद्रयान-2’मध्ये ऑर्बिटरसोबत लँडर आणि रोव्हरही पाठवण्यात आले होते. आता ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत जो काही अभ्यास केला जाईल, जो डाटा (माहिती) हाताला लागेल त्याच्या मदतीने पुढच्या ‘चांद्रयान-4’ या मोहिमेची आखणी करण्यात येणार आहे.

सध्या ‘गगनयान’च्या मदतीने संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी इस्रो प्रयत्नशील आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर मानवाला उतरवण्यात इस्रोला फार मोठी मदत होणार आहे. त्या क्षणाचे भाग्यदेखील आपल्याला लवकर लाभो ही प्रार्थना.

[email protected]