पुणे इसिस कनेक्शन; पडघ्यातील साकीब नाचनचा मुलगा शामीलला अटक; एनआयएची कारवाई

पुण्यातील इसिस मॉडय़ूल कनेक्शनप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने आज भिवंडीच्या पडघ्याजवळील बोरिवली गावातून शामील नाचन याला अटक केली. शामील हा साकीब नाचन याचा मुलगा असून साकीबलाही काही वर्षांपूर्वी दहशतवादी कारवायांप्रकरणी अटक झाली होती. शामील हा बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणे, स्फोट घडवणे या कृत्यात सहभागी होता. दरम्यान, शामीलच्या अटकेमुळे एनआयएने अटक केलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे.

पुण्यात इसिस कनेक्शनचा पर्दाफाश झाल्यानंतर एनआयएने 3 जुलै रोजी भिवंडीच्या (पडघा) बोरिवली गावातून झुल्फिकार अली बडोदावाला, शर्जील शेख आणि त्यापाठोपाठ 5 ऑगस्ट रोजी अकीब नाचन याला अटक केली होती. त्यानंतर एनआयएने कसून तपास केला असता शामील नाचन हा दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असल्याचे उघड झाले. इप्रोव्हाइज एक्स्प्लोझिव्ह डिवाईस (आयईडी) बनवणे, त्याचे प्रशिक्षण देणे आणि या बॉम्बची चाचणी घेणे याचा मास्टरमाइंड शामील नाचन असल्याचे समोर आले. झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, सीमाब नसिरुद्दीन काजी आणि अब्दुल कादीर पठाण या पाच जणांसह काही संशयितांच्या साथीने तो हे काम करत होता. यापैकी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे सुफा दहशतवादी टोळीचे सदस्य असून ते फरार झाले होते. एप्रिल 2022 मध्ये एनआयएने राजस्थानमध्ये कारमधून स्फोटके जप्त केल्यानंतर या दोघांनाही फरार घोषित केले होते.