पुणे – चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला

दारु पिण्यासठी घरफोड्या करणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाने अटक केली. चोरट्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आला असता पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

दिलीप कृष्णराव नाईक (वय 47, रा. झेड कॉर्नर, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. दोन दिवसांपुर्वी हडपसरमधील मांजरी भागात घरफोडीची घटना घडली होती. नाईक याने एका इमारतीतील प्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून मोबाइल आणि लॅपटॉप चोरून नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून चोरट्याचा माग काढण्यात येत होता. या दरम्यान चोरलेला लॅपटॉप आणि मोबाइल विक्रीसाठी एकजण के. के. घुले चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून नाईकला पकडले. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने दारू पिण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस अंमलदार दया शेगर, अमित कांबळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, पांडुरंग कांबळे यांनी ही कारवाई केली.