अदानीजी की जय म्हणा मोदीजी! राहुल गांधी यांचा सणसणीत टोला

नरेंद्र मोदी हे देशासाठी नाही तर अब्जाधीश उद्योजक गौतम अदानी यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे मोदींनी भारत माता की जय नाही तर अदानीजी की जय असे म्हणायला हवे. असा सणसणीत टोला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लगावला. राजस्थानमधील बुंदी आणि दाऊसा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.

मोदींना अदानींसाठी एक आणि गरीबांसाठी एक असे दोन हिंदुस्थान तयार करायचे आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. जातीनिहाय जनगणनेवरूनही राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर आरोप केला. काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वात आधी जातीनिहाय जनगणना करण्याचे काम सुरू करेल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले. मोदी हे सातत्याने भारत माता की जय अशी घोषणा करतात, पण 24 तास अदानींसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अदानी समुहाशी संबंधित आर्थिक अनियमिततेबाबत चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच भाजपाकडून अदानी यांना मिळवून देण्यात आलेल्या नफ्याप्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने यापूर्वीच करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्व आरोप अदानी समुहाने फेटाळले आहेत.

वॉररुमला दिली भेट

राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वॉररुमला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेसचे राजस्थानमधील प्रदेशाध्यक्ष सुखरिंदर सिंह रंधवा हेदेखील उपस्थित होते. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते.

उद्योजकांपैकी एक तरी दलित, आदिवासी दाखवा, भाषण बंद करीन

देशात जर कुणी ओबीसी, दलित किंवा आदिवासी यांपैकी कुणी एक जरी उद्योजक दिसला तर मी भाषण देणे बंद करेन, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. राजस्थानात भाजपा सत्तेत आली तर गेहलोत सरकारने ज्या कल्याणकारी योजना सुरू केल्या त्या बंद केल्या जातील याकडेही राहुल गांधी यांनी यावेळी लक्ष वेधले. दरम्यान, दलितांवर अन्याय करणाऱया नेत्याला काँग्रेसने कधीच उमेदवारीचे तिकीट दिले नाही. याउलट भाजपाने अशा लोकांचे स्वागत केले, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच देशात एक जात आहे असे मोदी म्हणतात आणि स्वतःला ओबीसी म्हणवतात मग ते एकटेच ओबीसी आहेत का? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.