सलमानच्या घराबाहेर महिनाभरापासून रेकी; तिघांची कसून चौकशी सुरू

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात वेगळी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस आणि वांद्रे येथील घराची महिनाभरापूर्वी रेकी केल्याचे समजते. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोलीस पोहचले आहेत. पोलीस तीन जणांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करत होते. पोलिसांचे पथक तिहार जेल, हरयाणा आणि गुडगाव येथे गेल्याचे समजते.

रविवारी पहाटे हल्लेखोर हे गॅलेक्सी अपार्टमेंट येथे गेले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हे मेहबूब स्टुडिओ येथे गेले. तेथे त्याने रिक्षावाल्यांना वसई येथे जाण्याचा रस्ता विचारला. त्या दोघांनी गुह्यात वापरलेली मोटरसायकल माउंट मेरी येथे सोडली. त्यानंतर ते रिक्षाने वांद्रे येथे गेले. तेथून लोकलने सांताक्रुझ येथे गेले. सांताक्रुझ पूर्व येथून वाकोला येथे रिक्षाने गेले. तेथून ते नवी मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजते. हल्लेखोरांनी गुह्यात वापरलेल्या मोटरसायकलच्या मालकाची माहिती पोलिसांना मिळाली. त्या मालकाची रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत होते. एका फुटेजमध्ये पोलिसांना गँगस्टर रोहित गोदाराच्या टोळीतील विशाल ऊर्फ कालू हा दिसला. कालू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कालू आणि अन्य एक शूटर हे पनवेल येथे एका घरात भाडय़ाने राहत होते. त्या घर मालकाचीदेखील पोलीस चौकशी करत आहेत. सलमानचे पनवेलजवळ फार्म हाऊस आहे. तिकडेदेखील या हल्लेखोरांनी महिनाभरापासून रेकी केल्याचे समजते. सलमान त्या फार्म हाऊसवर कधी येतो तसेच तो वांद्रे येथे कधी जातो याची रेकी हल्लेखोर करत असल्याचे समजते.

गोळीबाराचे धागेदोरे तिहार जेलपर्यंत

पोलिसांचे पथक हे तिहार जेल येथे चौकशीसाठी जाणार आहे. तिहार जेलमधून पोलीस काही माहिती काढणार आहेत. तर हल्लेखोर कालू हा गुडगावला राहतो. त्यामुळे पोलिसांचे एक पथक गुडगाव येथे गेले आहे. रोहितच्या सांगण्यावरून शूटरला शस्त्राची व्यवस्था केली गेली होती. रोहितला गोळीबाराचे आदेश अनमोल बिष्णोईने दिल्याचे समजते.

आयपी ऍड्रेस पोर्तुगालचा

गोळीबार केल्यानंतर फेसबुककर एक पोस्ट अपलोड झाली होती. बिश्नोई टोळीने गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. फेसबुक पोस्टप्रकरणी पोलिसांना एक महत्त्काची माहिती हाती लागली आहे. त्या पोस्टचा आयपी ऍड्रेस पोर्तुगाल असल्याचे समजते.