कराडमध्ये डॉक्टरच्या घरावर सशस्त्र दरोडा; 27 लाखांच्या रोख रकमेसह 48 तोळे सोन्याचे दागिने लुटले

येथील बारा डबरी परिसरातील शिंदेमळ्यात असलेल्या डॉ. एम. पी. शिंदे यांच्या बंगल्यात मध्यरात्री दरोडेखोरांनी सशस्त्र्ा दरोडा टाकला. चाकूच्या धाकाने दरोडेखोरांनी 27 लाखांच्या रोख रकमेसह नेकलेस, मंगळसूत्रासह 48 तोळे सोने लुटले. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेने कराड परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकासही पाचारण केले होते. याबाबत पूजा राजेश शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरातील बारा डबरी परिसरातील शिंदेमळा येथे डॉ. राजेश शिंदे व पूजा शिंदे हे दाम्पत्य कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांनी वैद्यकीय खर्चासाठी पै-पाहुणे, नातेवाईकांकडून गेल्या काही दिवसांत पैसे गोळा केले होते. या पैशांसह बँकेच्या लॉकरमध्ये असलेले दागिनेही नातेवाईकाच्या विवाहाला जाण्यासाठी त्यांनी घरात आणून ठेवले होते. रविवारी (9 रोजी) रात्री डॉक्टर कुटुंबीय नेहमीप्रमाणे झोपी गेले. डॉ. राजेश हे बंगल्यातील पहिल्या बेडरूममध्ये, तर पत्नी पूजा या मुली व आईसमवेत दुसऱया बेडरूममध्ये झोपल्या होत्या.

पहाटे तीनच्या सुमारास जवळपास सात ते आठ दरोडेखोर डॉ. शिंदे यांच्या बंगल्यात घुसले. त्यांनी सर्वप्रथम डॉ. शिंदे यांच्या बेडरूममध्ये शिरकाव केला. डॉ. राजेश यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पूजा उठून बाहेर आल्या. जिन्यावरून बेडरूमकडे जाताना पूजा यांना दोन दरोडेखोरांनी जिन्यावरच अडविले. त्यावेळी बेडरूममध्ये आणखी तीन ते चारजण होते. दरोडेखोरांनी डॉ. राजेश व पूजा यांना चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये नेले. तसेच इतर कुटुंबीयांनाही बेडरूममध्ये थांबवून ठेवले. दरोडेखोरांनी पूजा यांच्यासह त्यांची आई व नणंदेच्या गळ्यातील व कपाटात ठेवलेले 48 तोळे वजनाचे 19 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 27 लाख रुपयांची रोकड काढून घेत बंगल्याला बाहेरून कडय़ा लावून पलायन केले.

पहाटे दरोडय़ाची माहिती मिळताच अपर
पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तपासाच्या दृष्टीने पोलीस पथके तयार करून ती विविध ठिकाणी रवाना केली. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करीत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले होते; परंतु पावसामुळे श्वानांना तपासात अडथळा येत असल्याने त्यांच्या हाती कोणताही सुगावा लागला नाही. तसेच डॉ. शिंदे यांचे निवास्थान व परिसरातील रस्त्यांवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात आले आहे.