सामना अग्रलेख – शिंद्यांची भाकरी करपली! नवी चूल, नवा तवा!!

पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करतात व 24 तासांत भ्रष्टाचाऱ्यांसाठी पायघड्या घालतात. अजित पवार यांनी त्यांच्या काही समर्थकांसह पक्ष सोडला, तो काही फार मोठ्या नैतिकतेच्या विचाराने नक्कीच नाही. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे?

महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचाही चिखल मोदी व शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह रविवारी दुपारी राजभवनात पोहोचतात. पाठोपाठ देवेंद्र फडणवीस त्यांच्या लवाजम्यासह येतात व पवार हे आठ मंत्र्यांसह शपथ घेऊन स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतात. अजित पवार यांच्या सरकारीकरणास काय म्हणायचे? पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्यानेच असं सरकारजमा व्हायचे हे लोकशाहीच्या व नैतिकतेच्या कोणत्या प्रकारात बसते? लोकांची मती गुंग करणारा व राजकीय पुढाऱयांवरचा विश्वास उडवणारा प्रकार महाराष्ट्रात घडवला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रात भूकंप वगैरे झाला काय? तर अजिबात नाही. या भूपंपाची चाहूल आधीच लागली होती. त्यामुळे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे, आजचा दिवस मावळेल. उद्या नवा दिवस उजाडेल हेच खरे. जे शिवसेनेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी ‘डील’ पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल. या सगळय़ात ‘पोपट’ झाला आहे तो श्रीमान देवेंद्र फडणवीस यांचा. ‘‘नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱयांचा पक्ष आहे,’’ असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. छगन भुजबळ हे तर जामिनावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’च्या अटकेची तलवार आहे. तेसुद्धा हंगामी जामिनावर बाहेर आहेत. तटकरे यांचाही पाय खोलात आहे. सगळय़ांची प्रगतीपुस्तके ही तपास यंत्रणांच्या शेऱयांनी भरलेली आहेत. या सगळय़ांनी

श्रीमान फडणवीस यांच्या साक्षीने

मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल हेसुद्धा या सोहळय़ास उपस्थित होते. इक्बाल मिर्चाशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली. आता श्री. पटेल यांची संपत्ती मोकळी होईल व ते पेंद्रीय मंत्री होतील. शरद पवार यांना कालपर्यंत जे ‘देव’ मानत होते असे बरेच भक्तगण अजित पवारांसोबत गेले. नरहरी झिरवळ, नीलेश लंके, संजय बनसोडे वगैरे आमदारांची अलीकडची भाषणे याबाबत ऐकण्यासारखी आहेत. यानिमित्ताने एक झाले – भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भोपाळच्या ऐतिहासिक भाषणात सांगितले की, ‘पाटण्यात जमलेल्या विरोधी पक्षांनी 20 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.’ त्यातले अडीच लाख कोटी आता भाजपच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे पुढच्या भाषणात मोदी यांना सुधारित आकडा सांगावा लागेल. मोदी व शहा यांना भ्रष्टाचाराचे वावडे नाही. फक्त तो भाजपात येऊन करा एवढेच त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तपास यंत्रणांच्या कारवाया राजकीय दबावाखाली होतात व तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. मध्य प्रदेश, प. बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडूत हेच सुरू आहे. महाराष्ट्रात त्यांनी आधी शिवसेना पह्डली. आता राष्ट्रवादीवर हात घातला. सत्तेचा हा हपाप आहे. हे नवे सरकार लोकांच्या मनातले नाही. महाराष्ट्राच्या परंपरेला न पचणारे काम सध्या सुरू आहे. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच नव्हती व जनता या असल्या राजकारणाला कधीच पाठिंबा देणार नाही. अजित पवार शेवटपर्यंत सांगत होते, ‘‘शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ काय?’’ फडणवीस सांगत होते, ‘‘राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही.’’ पण दोघांनीही पलटी मारली. त्या पलटीमागे मिंधे गटाचा घात आहे. शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे. अजित पवार व त्यांचे लोक राजभवनात शपथ घेताना शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडले. अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, असे

अकांडतांडव करणारे

आता काय करणार? अजित पवार फुटीर राष्ट्रवादीसह सरकारात सामील झाले व निधीचे वाटप करणारे अर्थ खातेही त्यांच्याकडेच आले. शिंदे व त्यांच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार. ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे. एक मिंधे जातील व दुसरे येतील. महाराष्ट्राला त्यातून काय मिळाले? महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले की, सर्व चित्र पाहून मन विषण्ण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वैभवाला व्यापारी राजकारण्यांची दृष्ट लागली आहे. आम्ही कुणालाही विकत घेऊ शकतो, कोणताही पक्ष फोडू शकतो या अहंकाराने माजलेल्यांच्या हाती लोकशाहीची सूत्रं आहेत. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला हे तयार नाहीत. मुंबईसारख्या शहराला महापौर नाही. नगरसेवक नाहीत. सर्व बाजूंनी फक्त लूट आणि लूटच सुरू आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करतात व 24 तासांत भ्रष्टाचाऱ्यांसाठी पायघडय़ा घालतात. काँग्रेसचे व त्याआधीचे ब्रिटिशांचे राज्य यांच्यापेक्षा शंभर पटीने बरे होते. त्यांच्याशी निदान रस्त्यावर उतरून समोरासमोर लढता येत होते. आज जनतेच्या पाठीत रोज वार होत आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या काही समर्थकांसह पक्ष सोडला, तो काही फार मोठय़ा नैतिकतेच्या विचाराने नक्कीच नाही. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंदय़ांची भाकरी करपली. भाजप आता शिंदय़ांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे? अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रात भूपंप वगैरे झाल्याचे दिसत नाही. थोडा थरथराट झाला इतकेच!