सामना अग्रलेख – अपघातांची ‘समृद्धी’

समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत ‘समृद्धी’वर चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. सरकार मात्र फक्त शोक व्यक्त करणे आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे. हा ‘मृत्यू महामार्ग’ का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची ‘समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गांभीर्याने शोध घ्या.

महाराष्ट्रात ‘घटस्थापना’ होत असताना समृद्धी महामार्गावर अपघात घडला व 12 प्रवाशांचे बळी गेले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर-अगरसायगाव महामार्गावर हा अपघात घडला. समृद्धी महामार्ग लोकांची सोय व्हावी म्हणून बनवला की लोकांना असे निर्घृण मरण यावे म्हणून बनवला? असा एकही दिवस जात नाही की समृद्धी महामार्गावर अपघात घडला नाही अशी बातमी येत नाही. शनिवारी मध्यरात्री सैलानी बाबांच्या दर्शनावरून परतणाऱया भाविकांची टेम्पो ट्रव्हलर एका ट्रकला पाठीमागून धडकली. त्यात 12 जणांचा बळी गेला. हे सर्व मृत्यू जागीच झाले. पुढे धावणाऱया ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागे असलेली टेम्पो ट्रव्हलर त्यावर जोरात धडकली, असे सांगण्यात येत आहे. असेही सांगितले गेले की, या ट्रकचा पाठलाग आरटीओची गाडी करीत होती. त्यातून ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि हा अपघात झाला. हे जर खरे असेल तर ट्रकचा पाठलाग का होत होता? या प्रश्नाचे उत्तर या अपघाताबद्दल शोक व्यक्त करणाऱया सरकारने दिले पाहिजे. सरकारने जरूर शोक व्यक्त करावा, पण ट्रक आणि आरटीओ पाठलाग

हे कोडेही

जनतेला सोडवून सांगावे. हा पाठलाग असेल अथवा नसेल, पण समृद्धी महामार्गावरील प्रवाशांचा पाठलाग ‘यमदूत’ मात्र नक्कीच करीत आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेले अपघात आणि दुर्घटना, त्यातील बळींची मोठी संख्या हेच सिद्ध करते. समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत ‘समृद्धी’वर चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. सरकार मात्र फक्त शोक व्यक्त करणे आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे. हा ‘मृत्यू महामार्ग’ का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची ‘समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गांभीर्याने शोध घ्या. दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरजवळील या महामार्गाचा काही भाग सुमारे पाच इंच जमिनीखाली खचल्याची बातमी फोटोसह प्रसिद्ध झाली. दर्जा आणि गुणवत्तेबाबत छातीठोकपणे खात्री दिल्या गेलेल्या महामार्गाची ही अवस्था का व्हावी? या भागात महामार्गावर धावणारी वाहने मध्येच ‘जम्प’ घेतात असेही काहींचे म्हणणे आहे. ते जर खरे असेल तर त्यामुळे ‘समृद्धी’च्या बांधकाम पद्धतीवर निर्माण झालेले

प्रश्नचिन्ह

अधिक गडद होणार आहे. ‘गेम चेंजर’ वगैरे म्हटल्या गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेबाबत, बांधकाम पद्धतीबाबत अनेक शंका, असंख्य आक्षेप घेतले गेले. मागील दहा महिन्यांतील प्रत्येक अपघाताने या शंका, आक्षेप खरेच ठरविले. त्यात आता शनिवारी मध्यरात्री वैजापूरजवळील भीषण अपघाताची भर पडली. आणखी किती अपघात होऊ देणार आहात? अपघात आणि त्यातील बळी यांबाबत फक्त सहवेदना प्रकट करून आर्थिक मदत जाहीर केल्याने समृद्धी महामार्गावरील अपघात व अपघाती बळींचे दुष्टचक्र थांबणार नाही. शनिवारी रात्री झालेल्या अपघाताबद्दल आता पंतप्रधानांनीही शोक प्रकट केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केले. हा सरकारी सोपस्कार ठीक आहे, मात्र हे अपघातग्रस्तांच्या दुर्दैवी मृत्यूंचे खरे प्रायश्चित्त नाही. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱया अपघातांवरून ज्या शंका आणि आक्षेप घेतले गेले आहेत त्याबाबत राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहेत? ‘समृद्धी’, अपघात आणि शोक हे दुष्टचक्र कधी थांबणार? शनिवारच्या अपघातात हकनाक मरण पावलेल्या 12 भाविकांच्या शोकसंतप्त आत्म्यांचे हे सवाल आहेत. या महामार्गाला स्वतःचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणवून घेणाऱयांकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?