सामना अग्रलेख – हेमंत सोरेन रडले नाहीत, झुकले नाहीत!

भ्रष्टाचार, खून, बलात्कार, दरोडेखोरी करून भाजपात गेल्यावर अभय व मुक्ती मिळते व जे या दरोडेखोरीत सामील होण्यास नकार देतात त्यांना राजभवनात अटक करून तुरुंगात टाकले जाते. देशात हेच सुरू आहे. अरविंद केजरीवाल झुकायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी झुकण्यास नकार दिला. ममता बॅनर्जी लढायला सिद्ध आहेत. हेमंत सोरेन यांनी गुडघे टेकले नाहीत, रडले नाहीत व झुकले नाहीत. एखाद्या क्रांतिवीराप्रमाणे त्यांनी तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. या लढ्यातूनच देशाला नवी दिशा व स्वातंत्र्याचा प्रकाश मिळेल. जे झुकले, शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही. हेमंत सोरेन यांनी लढणाऱयांच्या अश्रूंचे मोल सांगितले. त्या अश्रूंतूनच उद्याचे वादळ निर्माण होईल!

सध्याच्या राजकीय वातावरणात सगळेच नितीश कुमार, अजित पवार किंवा एकनाथ मिंधे नसतात. काही स्वाभिमानी हेमंत सोरेनसुद्धा असतात. याची प्रचीती एव्हाना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना आली असेल. फक्त सात एकर जमिनीच्या व्यवहारांत मोदी-शहा यांनी ‘ईडी’च्या माध्यमातून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनातच अटक करायला लावली. सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमधील सरकार कोसळले. सोरेन यांच्या पक्षाच्या आमदारांत फाटाफूट होईल, ‘ईडी’च्या दबावाखाली आमदार पक्षांतर करतील व भाजपचे मनसुबे पूर्ण होतील अशी भाजपची अपेक्षा होती, पण यापैकी काहीच घडले नाही व हेमंत सोरेन यांचे उत्तराधिकारी चंपई सोरेन यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 आमदारांनी मतदान केले, तर विरोधात 29 आमदार. हे इतके बहुमत असतानाही राज्यपालांनी आधी चंपई सोरेन यांना चार दिवस शपथ दिली नाही. या चार दिवसांत सोरेन यांच्या आमदारांना गळाला लावता येईल असे मोदी-शहांना वाटले, पण झारखंडचा बाणेदार आदिवासी मोदी-शहांच्या झुंडशाहीपुढे झुकला नाही. महाराष्ट्रातील 40 औ 40 मिंध्या आमदारांनी या आदिवासी आमदारांच्या पायांचे तीर्थ प्राशन केले पाहिजे. सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे. अटकेत असलेल्या हेमंत सोरेन यांना विधानसभेतील मतदानासाठी सभागृहात येण्याची परवानगी दिली व ते आले. त्यांनी जोरदार भाषण करून मोदी-शहांच्या सूडाच्या राजकारणाला आव्हान दिले. सोरेन काय म्हणाले ते समजून घेतले पाहिजे. ‘आपल्यावरील सर्व आरोप ‘बेबुनियाद’ आहेत. कोणत्या तरी सात एकरांच्या जमीन व्यवहाराचा आरोप ठेवून

आपल्याला अटक

केली. या जमिनीचे कागद ईडीने समोर आणावेत. जनतेसमोर आणावेत. मी राजकीय संन्यास घेईन. इतकेच नव्हे तर, झारखंड सोडून कायमचा निघून जाईन.’ असे आव्हान हेमंत सोरेन देऊ शकतात ते त्यांचे नाणे खणखणीत असल्यामुळेच. सोरेन यांचे अटकेचे प्रकरण राजकीय दहशतवाद व दडपशाहीचे भयंकर प्रकरण आहे. एखाद्या राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे खोटय़ा प्रकरणात अटक करून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयोग लोकशाहीला अमान्य आहे. सोरेन हे जात्यात आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तूर्त सुपात असले तरी त्यांच्या अटकेची तयारी मोदी-शहा करत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी ‘ईडी’च्या धाकाने आधीच पाडले. तर बिहारच्या नितीश कुमारांना त्यांच्या मानसिक विकलांगतेचा गैरफायदा घेऊन ‘पलटी’ मारायला भाग पाडले. नितीश कुमारांच्या निकटवर्तीयांवरही ‘ईडी’च्या धाडी पडल्या. बिहारात नितीश कुमार झुकले, पण लालू यादव व त्यांचे कुटुंब मोदी-शहांसमोर झुकायला तयार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तर स्पह्टच केला. ‘भाजपात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव आहे.’ केजरीवाल यांनी जाहीर केले आहे की, ‘तुरुंगात जाईन. संघर्ष करीन, पण भाजपच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही.’ महाराष्ट्र हा शिवरायांचा वारसा सांगतो. तरी स्वतःस मर्द-मऱहाटे म्हणवून घेणाऱयांनी दिल्लीच्या पायाशी लोळण घेतली व महाराष्ट्राचे नाक कापले. पण झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लढाईसाठी तलवार उपसली. हेमंत सोरेन यांच्या अटकेने भाजपची विकृतीच उघड झाली. जेथे आपली राज्ये नाहीत ती दहशतीच्या बळावर उलथवून टाकायची. ही कोणत्या पद्धतीची लोकशाही? हा कोणता कायदा?

हे कसले स्वातंत्र्य?

अजित पवार, एकनाथ मिंध्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ते मोदींना प्रिय झाले; पण सोरेन, केजरीवाल हे त्यांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाऱयांचा पुंटणखाना बनला आहे व तेथे नीतिमत्ता, चारित्र्य अशा शब्दांना मोल उरले नाही. हेमंत सोरेन यांचा तुरुंगवास हा स्वाभिमान व स्वातंत्र्यासाठी लढणाऱयांना आदर्श ठरावा. हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावाचे मतदान करण्यासाठी झारखंड विधानसभेत पोहोचले तेव्हा त्यांच्या आमदारांच्या भावना अनावर झाल्या. अनेकांना हुंदके फुटले. जणू स्वातंत्र्य रक्षणासाठी ते सभागृह स्वाभिमानाच्या अश्रूंनी भिजले. त्या भावविवश वातावरणात हेमंत सोरे यांनी जे वक्तव्य केले ते ऐतिहासिक ठरावे. सोरेन म्हणाले, ‘रडू नका, माझ्याही डोळय़ांच्या कडा ओलावल्या आहेत, पण मी अश्रू ढाळणार नाही. हे अश्रू मी जपून ठेवीन. वेळ येईल तेव्हा या अश्रूंच्या ठिणग्या होतील.’ सोरेन यांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘राजभवनात प्रथमच एका मुख्यमंत्र्याला अटक झाली. आता इतकेच पाहायचे की, राष्ट्रपती भवनात, लोकसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी अटकांना कधी सुरुवात होते.’ देशाचे भयावह भविष्यच सोरेन यांनी सांगितले. लोकशाही व संविधान धोक्यात असल्याची ही हाक आहे. भ्रष्टाचार, खून, बलात्कार, दरोडेखोरी करून भाजपात गेल्यावर अभय व मुक्ती मिळते व जे या दरोडेखोरीत सामील होण्यास नकार देतात त्यांना राजभवनात अटक करून तुरुंगात टाकले जाते. देशात हेच सुरू आहे. अरविंद केजरीवाल झुकायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी झुकण्यास नकार दिला. ममता बॅनर्जी लढायला सिद्ध आहेत. हेमंत सोरेन यांनी गुडघे टेकले नाहीत, रडले नाहीत व झुकले नाहीत. एखाद्या क्रांतिवीराप्रमाणे त्यांनी तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. या लढय़ातूनच देशाला नवी दिशा व स्वातंत्र्याचा प्रकाश मिळेल. जे झुकले, शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही. हेमंत सोरेन यांनी लढणाऱयांच्या अश्रूंचे मोल सांगितले. त्या अश्रूंतूनच उद्याचे वादळ निर्माण होईल!