सामना अग्रलेख – दूषण आणि प्रदूषण

गेल्या आठ-नऊ वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्यामुळेच महाराष्ट्राची ‘हवा’ खराब झाली आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला. येथील सत्ताकारणाची गुणवत्ता घसरली. नशेबाजीचा विळखा महाराष्ट्रालाही पडतो की काय, इतपत सत्ता आणि सत्ताधाऱ्यांचे प्रदूषण झाले. महाराष्ट्र म्हणजे कालपर्यंत भारताचे ‘भूषण’ होता. मागील एक-दीड वर्षात महाराष्ट्राच्या नशिबी फक्त ‘दूषण’च येत आहे. त्यात वायू प्रदूषणाची भर पडली आहे. आता जनतेलाच या ‘कलुषित’ सरकारला घालवून महाराष्ट्राचे वातावरण पुन्हा एकदा शुद्ध आणि समृद्ध करावे लागेल!

मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आधीच ऑक्टोबर हीटचा तडाखा आणि उकाडय़ाच्या तीव्रतेने मुंबईकर हैराण आहेत. त्यात खराब हवेला तोंड देण्याची वेळदेखील सामान्य मुंबईकरांवर आली आहे. मुंबईतील वायू प्रदूषण एवढे का वाढले? येथील हवेची पातळी एवढी का घसरली? प्रश्न अनेक आहेत आणि सरकार त्यांची फक्त पठडीबाज उत्तरे देत आहे. वाढती बांधकामे, वाहन प्रदूषण अशी कारणे असतीलही, पण राज्याच्या माथी मारलेले सध्याचे ‘प्रदूषित’ सरकार आणि त्याचे दूषित कामकाज हेच त्याचे खरे कारण आहे. मुंबईतील वायू प्रदूषणाची सुरुवात तर सध्याच्या सरकारमध्ये ‘सीनियर उपप्रमुख’ असलेले जेव्हा राज्याचे प्रमुख होते तेव्हाच झाली होती. त्यांच्याच मेट्रो कारशेडच्या अट्टहासापायी आरेच्या जंगलातील दोन हजारांपेक्षा अधिक झाडांची रात्रीतून कत्तल केली गेली. मुंबईच्या पर्यावरणाचे ‘हृदय’ असे आरेच्या जंगलाला म्हटले जाते. ते ‘हृदय’च त्यावेळच्या राज्य प्रमुखांनी निर्घृणपणे काढून घेतले. ही वृक्षतोड थांबविण्यासाठी शाळकरी मुले आणि पर्यावरणवाद्यांनी केलेले आंदोलन दडपशाही आणि दंडुकेशाही करून दडपून टाकले गेले. त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पर्यावरणमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे यांनी त्या वेळी ‘आरे’चा ‘श्वास’ तर मोकळा केलाच, पण ‘माझी वसुंधरा अभियान’ यांसारखे अनेक उपक्रम राबवून संपूर्ण राज्याचेच पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्लीच्या ‘महाशक्ती’ने महाराष्ट्राच्या माथी एक

‘कलुषित’ सरकार

मारले आणि मुंबईसह महाराष्ट्र सर्वच बाबतीत कमालीचा ‘प्रदूषित’ झाला. केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांना मुंबईच्या ‘मराठी’ हवेची मोठीच ‘अॅलर्जी’ असल्यानेच त्यांनी हे ‘भेसळ’ सरकार राज्यावर लादले आहे. या सरकारच्या माध्यमातून मुंबई-महाराष्ट्राचे वातावरण जास्तीत जास्त कसे बिघडेल असा प्रयत्न दिल्लीकडून वारंवार होत आहे. मुंबई-महाराष्ट्राची प्रतिष्ठा, प्रतिमा मिंधे सरकारच्या कारभाराने काळवंडली आहे. राजकारणापासून सत्ताकारणापर्यंत, समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत, पर्यावरणापासून कायदा-सुव्यवस्थेपर्यंत महाराष्ट्राची गुणवत्ता खालावतच चालली आहे. सध्याचे महाराष्ट्रात असलेले सरकार हेच मुळात राजकीय प्रदूषणातून तयार झाले म्हटल्यावर दुसरे काय होणार? राज्याचे सत्ताकरण मिंधे असल्याने महाराष्ट्राच्या स्वाभिमानी सत्ताकारणाचा जो लौकिक देशभरात होता त्याला प्रदूषणाची ‘काजळी’ लागली आहे. येथील राजकारण आणि सत्ताकारणाची पातळी एवढी कधीच घसरलेली नव्हती. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग विरोधकांविरोधात सूड उगविण्यासाठी करण्याचे उद्योग केंद्राप्रमाणेच राज्य सरकारही करीत आहे. राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण कमी करण्याऐवजी विरोधकांच्या उद्योगांना

नोटिसा बजावण्यात दंग

आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ऍग्रो’मधील दोन प्लांट बंद करण्याची ‘तुघलकी’ नोटीस या मंडळाने बजावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने नंतर ती अवाजवी म्हणत रद्द केली आणि या सरकारचा ‘प्रदूषित’ कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आणला होता. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला तर दिल्लीकरांच्या पूर्वग्रह‘दूषित’ धोरणाचे तडाखे वारंवार बसत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग काय किंवा पाणी काय, गुजरातला पळवून नेले जात आहे. मुंबईचा आर्थिक राजधानीचा मुकुट हिरावून घेण्याचा हरेक प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राचे समाजकारण कधी नव्हे तेवढे गढुळ झाले आहे. जाती-जातीत मनभेदाचे प्रदूषण करण्याचे आणि त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे सत्ताधाऱयांचे प्रयत्न आहेत. समाजमन अस्वस्थ आणि अशांत असणे हे राज्य ‘शुद्ध’ असल्याचे लक्षण नक्कीच नाही. गेल्या आठ-नऊ वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्यामुळेच महाराष्ट्राची ‘हवा’ खराब झाली आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला. येथील सत्ताकारणाची गुणवत्ता घसरली. नशेबाजीचा विळखा महाराष्ट्रालाही पडतो की काय, इतपत सत्ता आणि सत्ताधाऱयांचे प्रदूषण झाले. महाराष्ट्र म्हणजे कालपर्यंत भारताचे ‘भूषण’ होता. मागील एक-दीड वर्षात महाराष्ट्राच्या नशिबी फक्त ‘दूषण’च येत आहे. त्यात वायू प्रदूषणाची भर पडली आहे. आता जनतेलाच या ‘कलुषित’ सरकारला घालवून महाराष्ट्राचे वातावरण पुन्हा एकदा शुद्ध आणि समृद्ध करावे लागेल!