सामना अग्रलेख – कोरोनात वाचले, विषारी हवेने तडफडले! मुंबई-महाराष्ट्रात आणीबाणी

मुंबईसह 16 शहरांत आरोग्यविषयक आणीबाणीच लागू झाली आहे. सरकारने रेड अॅलर्ट जारी केला. ऐन दिवाळीत लोकांवर बंधने आली. देवासमोर अगरबत्ती लावण्यावरही बंदी आली. सकाळ-संध्याकाळचे फिरणे थांबवा. दरवाजा-खिडक्या बंदच ठेवा. बारा ते चार घराबाहेर पडू नका, मास्क लावा, घरात झाडू मारू नका. थोडक्यात, धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरवंटाच फिरवला. काय हो राज्यपाल महोदय, हिंदुत्व संकटात आले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखादे पत्र लिहिता येईल काय? कोरोना संकटातून वाचवलेले मुंबई शहर सध्याच्या सरकारच्या बेफिकिरीमुळे पसरलेल्या विषारी हवेने तडफडत आहे!

महाराष्ट्रातील राजकारणाची गुणवत्ता ढासळली हे खरे, पण मुंबईसह राज्यातील हवेचीही गुणवत्ता त्यामुळे ढासळली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचे विषारी गॅस चेंबर झाले आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते. मात्र आता या ‘स्वप्ननगरी’त प्रदूषणामुळे लोकांना झोप येत नाही. शुद्ध हवेसाठी मुंबईकरांची फुप्फुसे दिवसरात्र झगडत आहेत. त्यामुळे स्वप्ननगरी, मायानगरी हे अलंकार नष्ट होऊन मुंबईचे विषालय झाले. भयंकर प्रदूषणामुळे मुंबईत एक प्रकारे आणीबाणीच लागू झाली असून गचाळ राज्यकर्ते, त्यांचा ढिसाळ व बेफिकीर कारभार मुंबईच्या या दुरवस्थेस जबाबदार आहे. मुंबईत सकाळपासून दूषित धुक्याची चादर निर्माण होऊन मुंबईकरांचा श्वास रोजच गुदमरतो आहे. मुंबईत बीकेसी, देवनार, माझगाव आणि सध्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विलेपार्ल्याची हवा पूर्ण खराब झाली. मालाड, जुहू, अंधेरी, पवई, वांद्रे आणि शिवाजी पार्कही प्रदूषित हवेच्या विळख्यात सापडले आहे. सरकार ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयात (?) दंग आहे व मुंबईकर गॅस चेंबरमध्ये तडफडतो आहे. फक्त मुंबईच नाही तर नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, सोलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, संभाजीनगर, पुणे, नागपूर, चंद्रपूर अशा असंख्य शहरांचीही फुप्फुसे प्रदूषणाने निकामी होताना दिसत आहेत. हे सरकारचे पाप आहे. ‘कोरोना’च्या भयंकर महामारी संकटात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले. संसर्ग रोखण्याच्या कठोर उपाययोजना केल्या. सर्व पालिका, जिल्हा प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी संवाद ठेवला. आज त्याच मुंबईचे व अन्य शहरांचे

आरोग्य बिघडून

लोक तडफडत आहेत. हे का घडत आहे? कारण मुंबईसह 14 महापालिकांचा कारभार वाऱ्यावर आहे. बिल्डर लोढा व मोती तलावाच्या प्रख्यात डोमकावळय़ाने महापालिकेत घुसून कार्यालय थाटले. ते नागरी सुविधांसाठी नसून एफएसआयचा हिशोब करण्यासाठी व ठेकेदारांकडून मलिदा खाण्यासाठी आहे. महापालिका प्रशासनास दिशा नाही, मार्गदर्शन नाही, कुणावर काही जबाबदारी नाही. मुंबई पालिकेस न जुमानता एमएमआरडीएने संपूर्ण मुंबई खणून ठेवली. मेट्रोची वारेमाप बांधकामे प्रदूषणाची काळजी न घेता सुरू आहेत. जमिनीखाली आणि वर सुरू असलेल्या अमर्याद बांधकामांनी सिमेंट, धूलिकण, धूर, कचरा मुंबईच्या हवेत उसळतो आहे. आरेचे जंगल निर्दयपणे तोडण्यात आले. पुन्हा ही सर्व कामे कधी पूर्ण होणार याचा भरवसा कोणालाच नाही. मुंबई-पुण्याचे हे असे गॅस चेंबर होऊनही राज्य सरकार स्वस्थ कसे? गाझापट्टीवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यांप्रमाणे मुंबईसह राज्याची भयाण दुर्दशा झाली आहे. मुंबईतील बिल्डरांवर, त्यांच्या बांधकाम प्रकल्पांवर कोणतेही निर्बंध नाहीत. पाडापाडीतून धुरळा उडतो व पुन्हा बांधकामातून सिमेंट उडते. ते विष मुंबईकरांच्या पोटात आणि फुप्फुसात जाते. मुंबईतील प्रदूषणाचे प्रकरण हायकोर्टात पोहोचले तेव्हा न्यायमूर्तीही भडकले. हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. उपाययोजना करा आणि बांधकामांमुळे होणारे प्रदूषण येत्या शुक्रवारपर्यंत रोखा, असे न्यायालयाने ठणकावले; पण मुंबईचे पालकमंत्रीच सगळय़ात मोठे बिल्डर आहेत व त्यांनीच आडवी मुंबई उभी करून सगळय़ात जास्त बांधकाम केले आहे. राज्याचे

प्रदूषण नियंत्रण मंडळही

त्यामुळे विष खाऊन पडले आहे. विकास आणि पुनर्विकासाच्या नावाखाली जे घडत आहे ते मुंबईला नष्ट करणारे आहे. रस्तेरुंदीकरण, विकासाच्या नावाखाली बेलगामपणे झाडे तोडली जात आहेत. वातावरणातील कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे विषारी वायू वनस्पती शोषून घेतात. वनस्पतीपासून ऑक्सिजन मिळत असतो, पण बिल्डरांच्या जंगलात वनस्पतींना मारून टाकले. दिल्लीतील विषारी प्रदूषणाच्या कथा आपण ऐकत होतो, पण मुंबईवर दिल्लीची आफत आली आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण होते व हवा बिघडते, पण दिवाळीचे फटाके फुटण्याआधीच मुंबई व इतर शहरांची हवा बिघडली आहे. मुंबईची इतकी दुर्दशा कधीच झाली नव्हती. कुणी अज्ञात महाशक्ती मुंबईवर सूड घेत आहे काय? मुंबई राहण्यालायक राहिलेली नाही, असे चित्र निर्माण करून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा कोणाचा डाव आहे का? महाराष्ट्राला विषाचे चेंबर करून हे राज्य उद्योगधंदा करण्याच्या योग्यतेचे उरलेले नाही असे विष पसरवून मुंबई आणि महाराष्ट्राला देशोधडीस लावण्याचे कारस्थान कोणी रचत आहे काय? मुंबईसह 16 शहरांत आरोग्यविषयक आणीबाणीच लागू झाली आहे. सरकारने रेड अॅलर्ट जारी केला. ऐन दिवाळीत लोकांवर बंधने आली. देवासमोर अगरबत्ती लावण्यावरही बंदी आली. सकाळ-संध्याकाळचे फिरणे थांबवा. दरवाजा-खिडक्या बंदच ठेवा. बारा ते चार घराबाहेर पडू नका, मास्क लावा, घरात झाडू मारू नका. थोडक्यात, धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरवंटाच फिरवला. काय हो राज्यपाल महोदय, हिंदुत्व संकटात आले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखादे पत्र लिहिता येईल काय? कोरोना संकटातून वाचवलेले मुंबई शहर सध्याच्या सरकारच्या बेफिकिरीमुळे पसरलेल्या विषारी हवेने तडफडत आहे!