सांगलीत 41 किलो चांदीचे दागिने जप्त, शहर पोलिसांची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट’ असलेल्या पोलिसांनी तब्बल 41 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. सांगलीवाडी टोलनाक्यावरील नाकाबंदीत जप्त करण्यात आलेल्या या दागिन्यांची किंमत 25 लाख 92 हजार रुपये असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलीस आणि इतर कर्मचाऱयांची संयुक्त पथके तयार करून नाकाबंदी केली जाते. या नाकाबंदीत मोठय़ा रकमेची किंवा अन्य मौल्यवान वस्तूंची विनापरवाना वाहतूक केली जात असेल, तर कारवाई केली जाते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी सांगलीवाडी येथील टोलनाक्यावरून विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले. वाहनात असलेले देवेंद्र बाबूलाल माळी (रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) हे विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. या दागिन्यांबाबत निवडणूक आयोगाने सांगली जिह्यासाठी स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीला आणि सेवा व वस्तूकर अधिकाऱयांना अहवाल देण्यात
आला आहे.

पोलीस निरीक्षक मोरे यांच्या आदेशाने उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, हवालदार अजय माने, निशांत मागाडे, महेश मुळीक, धनाजी मोरे, अविनाश सागर, संदीप नागरगोजे व निवडणूक पथकातील निखिल म्हांगारे, शंकर भंडारी, प्रमोद भिसे यांनी ही कारवाई केली.