अपघातग्रस्तांच्या चिता जळताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा घेणे हे निर्घृण राजकारण, संजय राऊत बरसले

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या कालच्या राजभवनातील शपथविधी सोहळ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सध्या निर्दयी आणि निर्घृण राजकारण सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे. दिल्ली येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, “समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या चिता जळत असताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. त्या अपघातात बारामतीमधील तीन लोंकांचा मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काहींचा मृतांमध्ये समावेश आहे. नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. या अपघाताला २४ तास उलटत नाहीत तेव्हाच राजभवनात यांनी शपथा घेतल्या, पेढे वाटले, फटाके वाजवले आणि मिठ्या मारल्या असं निर्घृण राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही. यांना 1 दिवस थांबता आलं असतं. कालचं चित्र महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासणारं आहे. भाजपला या राजकारणाची किंमत चुकवावी लागेल.”

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरूला दगा दिला

“आज गुरुपौर्णिमा असल्याने सर्वात आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. कालपर्यंत शरद पवार हे कोणाचे तरी गुरु होते. मात्र गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरूला दगा देण्यात आला. महाराष्ट्रात दगाबाजीचं राजकारण काही काळापासून सुरु झालेलं आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणातून, राजकारणातून व इतिहासातून बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या टोलेजंग नेतृत्वाचं कार्य, संघर्ष आणि इतिहास कायमचा पुसून टाकला जावा यासाठी हे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रात गद्दारीचा आणि बेईमानीचा इतिहास लिहिला जावा आणि नवीन पाखरं निर्माण व्हावीत यासाठी सुरु असणारा हा खेळ देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारा नाही.” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

शिंदेंना हटवून महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार

“अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलेला आहे. पण आत्ताच डील हे मुख्यमंत्री पदाचं आहे. खरंतर अजित पवार आणि छगन भुजबळ चक्की पीसींग असं भाषण देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मग आता चक्की कोण पिसतय? देशाच्या राजकारणाशी आणि लोकशाहीशी हा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील जनता आमच्या सोबत आहे. महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती अशी कधीच नव्हती. मात्र मी आजही सांगतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. एकनाथ शिंदेंना हटवून महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार असल्याने भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं आहे.” असे राऊत म्हणाले.

“शिंदेंना आपण वाचवू शकत नाही हे महाशक्तीला देखील कळून चुकलं आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल. 10 ऑगस्ट पर्यंत त्यांना निर्णय द्यावाच लागेल. शिंदे अपात्र झाल्यानंतर पुढच्या मुख्यमंत्र्यांची व्यवस्था भाजपने केली आहे.” असे ते म्हणाले.

आयाराम गयारामच्या राजकारणाला जनता धडा शिकवेल

यावेळी राऊत म्हणाले की. “मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा आम्ही त्यांच्या कडून चांगल्या राजकारणाची अपेक्षा केली होती. यासाठीच लोकांनी काँग्रेसला नाकारून त्यांना मतदान केलं होतं. मात्र मोदी काँग्रेस पेक्षाही वाईट काम करत आहेत. आयाराम गयारामच्या या राजकारणाला जनता धडा शिकवेल. अजित पवार जाणार होते हे सगळ्यांना माहित होतं. याआधी त्यांनी तीन वेळा प्रयत्न केला होता. हे सगळं ईडीचं राजकारण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आमच्या हातात द्या आम्ही सुद्धा देशाचं आणि राज्याच राजकारण बदलून दाखवतो.”

“समान नागरी कायद्याचा आधी ड्राफ्ट पहिला जाईल. हा नक्की काय कायदा आहे. त्यात सामाजिक न्याय मिळण्याविषयी काय म्हटलं आहे. महिला आणि आदिवासींची किती चिंता आहे? हिंदू कोड बिल विषयी काय म्हटलं आहे? हे सगळं पाहिलं जाईल.” असे राऊत म्हणाले.