महाराष्ट्रात मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार असा ‘सामना’, संजय राऊत यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे आणि मोदींचा पराभव होईल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस कुठल्यातरी अंधाऱ्या गुहेमध्ये चाचपडत आहेत. त्यांना सत्य परिस्थिती माहिती नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

बारामतीमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना असल्याचे विधान फडणवीस यांनी केले होते. याबाबत सांगलीतील पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला ते उत्तर देत होते.

मिंधे गटाऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी कल्या-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरही खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. मिंधे गटाचे अस्तित्वच नसून बाळासाहेब ठाकरे यांचा चोरलेला धनुष्यबाणही ते वाचवू शकलेले नाहीत. हा धनुष्यबाण भाजप त्यांना काही मतदारसंघात वापरू देत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व भाजपला महाराष्ट्रातून संपवायचे असून त्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. कोकणसह अनेक मतदारसंघात 40-5 वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो. धनुष्यबाणावर लोकांची श्रद्ध आहे, पण भाजपने लोकांच्या मनातील धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला असून मिंधे शेपूट घालून बसले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीला वसुली सरकार म्हणणाऱ्या फडणवीसांचा राऊत यांनी समाचार घेतला. आमच्यातील सगळे वसुलीखोर, वसुली रॅकेट चालवणारे भाजपने त्यांच्या पक्षात घेतले असून मोठे वसुली रॅकेट सुरू केले आहे. आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. ईडी, सीबीआय हे भाजपचेच लोकं असून त्यांच्यामुळेच 8 हजार कोटींचा निधी त्यांच्या खात्यात जमा झाला. त्यामुळे फडणवीस यांना उपचारांची गरज असून जर नागपुरात उपचार होत नसतील तर ठाण्यात किंवा मुंबईत उपचार करू, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

सांगलीत लोकांना बदल हवा

सांगलीतील जागेबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, इथल्या लोकांना बदल हवा आहे. बदल घडवायचा असेल तर एकास एक लढत व्हावी अशी भाजपसह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची मागणी आहे. सांगलीत विद्यमान खासदारांविरुद्ध खदखद असून शिवसेनेच्या उमेदवाराला लोकांचा पाठिंबा मिळतोय. त्यात कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहे का? ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत, असेही राऊत म्हणाले.