सांगलीत भाजपचे दोन उमेदवार, एक काका आणि दुसरे दादा; संजय राऊत यांची फटकेबाजी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेसाठी सांगलीला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचे सूचक विधान केले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर, गाड्यांची तपासणी केली जात असून याबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, “सांगलीमध्ये भाजपचे दोन उमेदवार उभे आहेत. त्याच्यामुळे आम्ही असे म्हणतो की दोन उमेदवारांना रसद पुरवायची असेल तर ती भाजपने पुरवावी. एक काका (संजयकाका पाटील), तर दुसरे दादा (विशाल पाटील) आहेत. काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले होते आणि उद्या भोगी येणार आहेत. येऊद्या, आम्हाला चिंता नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करत असून आमची विमानं, गाड्या, खोल्या काय तपासायचे ते तपासा काही हरकत नाही.”

शिवसेना फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या दाव्यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “फडणवीस काही गौप्यस्फोट करत नसून त्यांकडे काहीही गोपनीय माहिती नाही. स्फोट करावा अशी कोणतीही गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. ते लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोटे आरोप करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत. मोदी-शहांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही, त्या पदासाठी लायक समजले नाही तिथे आम्ही काय मुख्यमंत्रीपद देणार”, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, “फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून बहकल्यासारखे बोलत असतात. त्याचे कारण असे आहे की महाराष्ट्राची जमीन त्यांच्या पायाखालून पूर्णपणे सरकत आहे. ते लोकसभा हरताहेत, राजकारण हरताहेत आणि उद्याच्या विधानसभाही हरणार आहेत. फडणवीस यांनी महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण केले ती तलवाकर आता त्यांच्यावरच उलटतेय आणि या भयातून ते लवंगी फटाके फोडत आहेत.”

निवडणूक आयोगाने माती खाल्ली, मतदानानंतर 11 दिवसांनी टक्केवारी वाढली कशी? – संजय राऊत

दरम्यान, ज्या रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याच्या गोष्टी करत होते त्यांनाच आता तिकीट देण्यात आले आहे. याबाबत बोलताना राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजप आणि सोमय्या यांचा समाचार घेतला. “वायकर, जाधव, शेवाळे यांच्या प्रचाराला आता फडणवीस आणि मुलुंडचा नागडा पोपटलाल जातील. त्यांना जाणे गरजेचे आहे, कारण ते त्यांचे आदर्श आहेत. ज्यांना तुरुंगात टाकणार होते आता त्यांनाच खांद्यावर घेऊन नाचणार आहेत”, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.