संजय सिंह म्हणाले, तुरुंगात डांबल्याबद्दल मोदींचे आभार

दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना जामीन मिळाला. कुठलेही पुरावे नसताना तुरुंगात डांबणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंह यांनी आभार मानले आहेत. तुरुंगात राहिल्यामुळे क्रांतिकारकांची पुस्तके वाचता आली. स्वतःशी बोलता आले, भेटता आले, अशा शब्दांत सिंह यांनी एक व्हिडीओ एक्सवरून पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदींनी जर मला ही संधी दिली नसती तर महापुरुषांशी भेट झाली नसती, स्वतःशी बोलता आले नसते. कारण, जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात असते तेव्हा तिला विचार करण्याची, मनन आणि चिंतन करण्याची संधी मिळते. मी नेल्सन मंडेलांवरचे पुस्तक वाचले. त्यांचे क्रांतिकारी जीवन अतिशय शानदार होते. 23 वर्षांचे असताना देशासाठी फासावर गेलेल्या भगत सिंग यांना आणखी जवळून जाणून घेता आले. अशफाक उल्ला, रोशन सिंह, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल आणि अनेक क्रांतिकारक, ज्यांच्याबद्दल अनेकांना फारसे काही माहीत नाही त्यांच्याबद्दल जाणून घेता आले, असेही संजय सिंह यांनी म्हटले आहे.