जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करा! संयुक्त कृती समितीची मागणी

एकीकडे सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभे राहत आहे. परंतु सरकारमधील मंत्री छगन भुजबळ वादग्रस्त विधाने करून मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध नाभिक समाज अशी जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जाट, मराठा, गुर्जर, पाटीदार संयुक्त कृती समितीने सरकारकडे केली.

दादर येथील शिवाजी मंदिरमधील शिवनेरी सभागृहात जाट, मराठा, गुर्जर, पाटीदार संयुक्त कृती समितीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. कुठलाही निर्णय हा मंत्रिमंडळाचा सामूहिक असतो. असे असताना त्याला मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने जाहीर विरोध करणे हे योग्य नाही आणि त्यांच्यावर कारवाई कुठलीही कारवाई होत नाही. ही सरकारची भूमिका दुटप्पी असून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर संयुक्त कृती समिती आंदोलन सुरू करेल, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी जाहीर केली.

यावेळी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिपैत, अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेव्रेटरी युद्धवीर सिंह, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा, राजस्थान गुर्जर महासभेचे हिंमतसिंह गुजर, वीर गुर्जर महासभाचे सुभाष चौधरी, परविंदर आव्हाना, नंदरूप चौधरी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजी दहातोंडे, प्रवक्ता श्रीरंग बरगे उपस्थित होते.