शरद पवार 57 वर्षांनंतर काकडे कुटुंबीयांच्या घरी

राज्याच्या राजकारणात पवार- काकडे संघर्ष राज्याने बघितला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय प्रतिस्पर्धी असणारे काकडे कुटुंबीयांची तब्बल 57 वर्षांनंतर शुक्रवारी भेट घेतली.

ज्येष्ठ नेते आणि मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे माजी संचालक श्यामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट दिली. माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी पंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांच्या सांत्वन भेटीसाठी निंबूत तेथे आले होते. या वेळी श्यामकाका काकडे, शेतकरी कृती समिती जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे, संभाजीराव काकडे यांचे पुत्र पृथ्वीराज, जयराज आणि मेघराज, नातू सह्याद्री कदम आदी उपस्थित होते.

बारामतीच्या आणि राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काकडे कुटुंबाच्या घरी शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली. 1967 पासून राज्याच्या विविध निवडणुकांत पवार-काकडे संघर्ष टोकाला गेलेला सर्वांनी पाहिला. सोमेश्वर कारखाना निवडणुकीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलने वेळोवेळी काकडे गटावर मात केली. शेतकरी कृती समितीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्ष पाच वर्षांपूर्वी संपल्यानंतर काकडे कुटुंबाने अजित पवार यांना निवडणुकीत वेळोवेळी मदत केली आहे. पवार-काकडे हा संघर्ष सर्वांना न्यात होता. या संघर्षाची धार आता कमी झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. आर.ए. जगताप यांच्या निधनाबद्दल जगताप परिवाराचे सांत्वन पवार यांनी सांगवी येथे केले. या वेळी त्यांनी अचानक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची भेट घेतली.

भेटीमध्ये वेगळे काही नाही – शरद पवार

मी आजच्या दौऱयात काकडे व तावरे यांची भेट घेतली. सांत्वनपर भेटीसाठी मी गेलो होतो. या भेटीमध्ये वेगळे काही नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केली. काकडे कुटुंबात दुःखद घटना घडल्याने मी सांत्वनपर भेटीसाठी गेलो होतो. त्या कुटुंबाचे प्रमुख बाबालाल काकडे यांच्या निधनानंतरही मी भेट घेतली होती. अशा सांत्वनपर भेटी एक सभ्यता व सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्या परिसरात महत्त्वाची कामगिरी करणाऱया एखाद्या कुटुंबात अशा घटना घडतात तेव्हा सांत्वनपर भेट घेतली जाते. बाकी त्यात काही नाही, असे शरद पवार म्हणाले.