Sharad Pawar : 10 वर्षांत तुम्ही काय केलं ते आधी सांगा? शेतकरी आत्महत्यांवरून पवारांनी काढली अमित शहांची खरडपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ म्हणजेच जाहीरनामा आज पुण्यात पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी मोठी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवरून टीका करणाऱ्या अमित शहांचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी अमित शहांना कडक शब्दांत सुनावले.

अमरावतीत अमित शहा यांची बुधवारी प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत अमित शहा यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांना शरद पवार यांना जबाबदार ठरवत गंभीर आरोप केला. ‘भाजप उमेदवार नवनीत राणा यांना गेल्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. यामुळे मतदारांची माफी मागतो, असं शरद पवार अमरावतीमधील सभेत म्हणाले. पवारसाहेब तुम्ही अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही तुम्ही विदर्भाच्या सिंचनासाठी काहीच केलं नाही. तुम्हाला माफी मागायची असेल तर, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा, त्यांच्या विधवांची माफी मागा’, असं अमित शहा म्हणाले होते.

देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा घणाघात

काय म्हणाले शरद पवार?

अमित शहा यांनी केलेल्या टिकेचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत शेतकरी आत्महत्यांवरून अमित शहांना खडे बोल सुनावलं आहे. ‘2014 ते 2024 या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारमध्ये अमित शहा यांच्या भाजपची सत्ता होती. यामुळे गेल्या 10 वर्षांत त्यांनी काय केलं ते आधी सांगावं. 10 वर्षांपूर्वी किंवा 20-40 वर्षांपूर्वी तुम्ही काय केलं? याचं स्पष्टीकरण मागण्याचा त्यांना अधिकार नाही. तसेच ज्यांना शेतीबद्दलचं मर्यादित ज्ञान आहे, त्यांच्या प्रश्नांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना फार महत्त्व देऊ नये’, असं सांगत शरद पवार यांनी अमित शहा यांना सणसणीत टोला लगावला.

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा सांगली जिल्ह्यात झंझावात

‘अमित शहांकडे काय उत्तर आहे?’

शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही अमित शहांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली. ‘2001 ते 2013 या काळात अमरावती जिल्ह्यात दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे 168 होतं. तर भाजप सरकारच्या 2014-2022 या काळात दरवर्षी अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण 353 होतं. म्हणजेच पवार यांच्या कार्यकाळात हे प्रमाण कमी झालं होतं. आता 2014 पासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्येचं प्रमाण 353 पर्यंत वाढलं. अकोल्यात 109 होतं ते 171 झालं. यवतमाळमध्ये 214 इतकी संख्या होती ती 324 वर गेली. बुलडाण्यात 117 वरून 289 पर्यंत दवर्षी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. वाशिममध्ये 81 वरून हे प्रमाण 101 झालं. याला अमित शहांकडे काय उत्तर आहे? शेतकरी आत्महत्या व्हायला लागल्या तेव्हा शरद पवारसाहेबांनी त्यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना यवतमाळमध्ये आणलं होतं. तिथे परिषद घेतली. विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत जिथे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे, त्यावेळी उपाययोजना करण्याचं काम केलं होतं. आता गेल्या 10 वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काहीच दिलं नाही. उलट अमरावती विभागातला सिंचनाचा अनुशेष त्यांना भरून काढता आला नाही. राज्यात आमचं अडीच वर्ष सरकार असताना राज्यपालांच्या सूचनेनुसार अमरावती विभागाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम आम्ही केलं’, असं जयंत पाटील म्हणाले.