दमदाटीला बळी पडणारी आमची अवलाद नाही, पक्षफोड्यांना जागा दाखवणारच; शरद पवार यांचा फडणवीसांना इशारा

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडणाऱयांना लाखो शिवसैनिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. भारतीय जनता पक्षाने पक्ष पह्डल्यानंतरही हजारो कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत, तरीही काही जण त्यांना दमदाटी करत आहेत, पण दमदाटीला बळी पडणारी आमची अवलाद नाही, असेही पवार यांनी बजावून सांगितले.

महाविकास आघाडी बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आज झाला. या मेळाव्याला शरद पवार यांनी संबोधित केले. दोन पक्ष पह्डून आलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावरून पवार यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. पक्ष पह्डले तरी हजारो, लाखो कार्यकर्ते शिवसेना आणि राष्ट्रवादीत मजबुतीने उभे आहेत, असे पवार म्हणाले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष-खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आदी उपस्थित होते.

आम्ही माणसे जोडली आणि भाजपने पक्ष फोड़ले

आम्ही माणसे जोडतो, त्यांच्याबद्दल आदर दाखवतो. पण फडणवीसांनी पक्ष पह्डले, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. आज बारामतीकडे देशाचे लक्ष आहे असे सांगतानाच महाविकास आघाडी नक्कीच जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी दिवसाचे 17-18 तास काम केले
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणाला करायचे याची चर्चा सुरू होती. त्या वेळी उद्धव ठाकरे माझ्या शेजारी बसले होते, मी त्यांचा हात धरला आणि वर केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावे ही माझी भूमिका होती, असे पवार म्हणाले. कोरोना काळात तब्येत ठीक नसतानाही उद्धव ठाकरे यांनी दिवसाचे 17-18 तास काम केले होते, असे प्रशंसोद्गारही पवार यांनी काढले.