शिरीषायन – मी (पण) पक्ष सोडला!

>> शिरीष कणेकर

मला राजकारणातलं काही कळत नाही. (कशातलं कळतं? बायको सर्वज्ञ आहे म्हणून चाललंय.) आसपासच्या सगळय़ांना राजकारणात (फास्ट बॉलर) बुमराह इतकी गती असताना मला गोगलगाई इतकीही गती असू नये? अमुक-तमुक एकाएकी एका पार्टीतून दुसऱया पार्टीत गेला हे सांगताना टीव्हीवरचा निवेदकही पतंगासारखा उडतो. मला काहीच वाटत नाही. कारण तो मूळ कुठल्या पार्टीत असतो हेच मला माहीत नसतं. या पार्टीतून त्या पार्टीत म्हणजे मला या कुशीवरून त्या कुशीवर वळल्यासारखं वाटतं आलंय. तुम्ही तेच, झोप तीच, बिछाना तोच, फक्त तुमचं तोंड वेगळय़ा दिशेला. काही काही लोक इतक्या वेळा कुशी बदलतात की, ते या कुशीवर पूर्वी कधी होते का? हे त्यांच्या अनुयायांना व त्यांना स्वत:लाही आठवत नाही.

एक मात्र मला चांगलं कळलंय. तुम्ही ज्या कुठल्या पक्षात असाल तिथं मुठी आवळून, चेहरा पिळवटून, तावातावानं बोलायचं. कोणीच ऐकत नसल्यानं मागल्या पक्षातलंच भाषण पुन्हा केलंत तरी चालेल. सर्व पक्षांची ध्येयधोरणे तीच असतात, फक्त ती गाठण्याचे मार्ग भिन्न असतात. जसं व्हीटीला जायचंय, पण तिथे पोहोचायचे रस्ते वेगवेगळे असतात. एका रस्त्यानं गेलात की एक पक्ष, दुसऱया रस्त्यानं गेलात तर दुसरा पक्ष, तिसऱया रस्त्यानं गेलात तर तिसरा पक्ष, चौथा रस्ता नसेल तर खोदून नवा रस्ता तयार करणे म्हणजे चौथा पक्ष स्थापन करणे. मग आपापसात रणकंदन कशासाठी? कोणाचा रस्ता शार्टकट आहे यावरून सुंदोपसुंदी होते. एका रस्त्यावर धावणारी गाडी कार्यकर्त्यांच्या व सक्षम नेतृत्वाच्या प्रयत्नामुळे आपल्या रस्त्यावर आणायची हा अट्टाहास. अरे, मला राजकारण कळायला लागलं की काय?

पक्ष सोडणारे का सोडतात? कारण देशसेवा करण्याच्या, समाजकार्य करण्याच्या, गोरगरीबांची सेवा करण्याच्या, सर्वसामान्यांचं भलं करण्याच्या त्यांच्या मनातील ऊर्मीला पक्षात वाव मिळत नव्हता म्हणून नवीन पक्षात तो मिळणार असतो. ज्या कारणासाठी राजकारणात आलो ते समाजासाठी तीळतीळ झिजणं जर अमुक पक्ष करू देणार नसेल तर तो सोडण्याला पर्याय काय? इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा, पक्षशिस्त मोडण्याचा, चालत्या गाडय़ाला खीळ घालण्याचा किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कोंब फुटण्याचा प्रश्नच नाही. का तुम्हाला समजत नाही? का तुम्ही गैरसमज करून घेताय? का तुम्ही माझ्या अविचल निष्ठेबद्दल शंका घेता? का मला लोकमान्यांचा पुनर्जन्म म्हणत नाही?…
मी सकाळी घरातून बाहेर पडतो तेव्हा एका पक्षात असतो. रात्री घरी येतो तेव्हा दुसऱया पक्षात गेलेलो असतो. अनेकदा सकाळी जागा होतो तो रात्रीच्या अंधकारात. कधी कधी मी वेगळय़ा पक्षात गेलेलो असतो. या भ्रमणाला, या खांदेपालटाला मूळ मूल्यांशी निष्ठा मानली जायला हवी.

राजकारणात सत्ता मिळवून पैशाच्या राशी उभ्या करायच्या हा सत्तालोलुप, स्वार्थी व शुद्र विचार आमचा कधीच नव्हता. काय करणार आम्ही त्या निर्जीव पैशाचं? आमच्याकडे पडून असलेल्या सात हजार कोटी रुपयांचं काय करायचं हे तरी आम्हाला अजून कुठे कळलंय? आमच्या मुलांना तेवढय़ा पैशात आयुष्य काढता येईल? अन् शेवंतापासून मला झालेल्या मुलांचं काय? त्यांची जबाबदारी घेणं व त्यांना समाजात सुयोग्य स्थान मिळवून देणं हे आमचं परमकर्तव्य आहे.

अरे हो! बरं आठवलं. उद्या मला पत्रकार केदार डुबे भेटायला येणार आहे. त्याला माझं चरित्र लिहायचंय. गंगेप्रमाणे पवित्र असलेल्या माणसाचं चरित्र ते काय लिहायचं? आयुष्यात काही चढउतार हवेत, कमी जास्त हवं, मग चरित्र वाचनीय होतं. परवा केदार माझ्या बंगल्यामागे शेवंताशी बोलत होता. ते माझ्या आत्मचरित्राच्या संदर्भात तर नसेल ना? देशाचं भवितव्य घडविणाऱया माणसाच्या डोक्याला काय हे नसते त्रास? केदार सोबत फोटोग्राफर घेऊन येणार हे कळल्यापासून शेवंता मागेच लागल्येय की, फोटोसाठी मीच तुमच्याबरोबर उभी राहणार म्हणून. तिला काय पक्षाच्या ‘इमेज’चं म्हणा!

पण कुठला पक्ष? माझं चरित्र लिहून प्रसिद्ध होईपर्यंत मी कुठल्या पक्षात असेन कोणीतरी सांगू शकेल का? पक्षातील राजकारण करणारा कनवाळू माणूस मी. ही माणसं मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? तुम्हीच बघा, इतक्या महान व्यक्तीचा काय छळ चाललाय तो. सावरकरांचा केला. आता माझा करतायत. कोलू पिसायची प्राक्टिस कुठे करता येईल?…
[email protected]