उद्धव ठाकरे यांचा झंझावात सिंधुदुर्गात, 4 व 5 फेब्रुवारीला जनसंवाद यात्रा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी येत्या 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. या यात्रेदरम्यान सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. उद्धव ठाकरे हे कोकणात येत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आणि संदेश पारकर यांनी आज विजय भवन येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथे दाखल होतील. गांधी चौक येथे त्यांचे भव्य स्वागत केले जाईल. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता कुडाळ शहरात ते जनसंवाद यात्रेत सहभागी होतील. ओरोस येथेही त्यांचे स्वागत होईल आणि दुपारी 2 वाजता त्यांचे मालवणला प्रयाण होईल.

भराडी देवीचे दर्शन घेणार

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंहासन लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर किल्ल्यावरील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. तेथून सायंकाळी उशिरा त्यांचे कणकवली येथे आगमन होईल. कणकवली येथेही उद्धव ठाकरे यांच्या भव्य स्वागताची तयारी करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीला तळेरे येथील कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे रत्नागिरीच्या दिशेने जाणार आहेत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी कणकवली विधानसभा सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, बाळा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, भाई गोवेकर, संदीप कदम, राजू राठोड आदी उपस्थित होते.