धारावीकर, गिरणी कामगार आणि पोलिसांना जिथल्या तिथे 500 फुटांचे घर द्या! उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला ठणकावले

धारावी वाचवण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खणखणीत आणि दणदणीत असा अतिविराट मोर्चा अदानीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयावर धडकला. ‘धारावी आमच्या हक्काची, नाही मोदींच्या मित्राची…’, ‘अदानी हटाव, धारावी बचाव…’ अशा गगनभेदी घोषणा देत लाखो धारावीकर रस्त्यावर उतरले. धारावी अदानीच्या घशात घालणाऱया मिंधे आणि भाजपला धडकी भरवणाराच हा मोर्चा होता. या महामोर्चाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले. ‘धारावीचा पुनर्विकास सरकारने केला पाहिजे. धारावीकर, गिरणी कामगार, सरकारी कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिसांना जिथल्या तिथे 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही,’ असे बजावतानाच धारावीकरांच्या हक्काच्या लढय़ासाठी मुंबईच काय, अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी अदानीची सुपारी घेतली त्या दलालांना चेचून ठेचून टाकू. ते पुन्हा अदानीचे नावही घेणार नाहीत, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. या मोर्चात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्यांसह 18 पक्ष आणि विविध संस्था-संघटना सामील झाल्या. एकजुटीची जबरदस्त वज्रमूठ धारावीकरांसाठी आवळली गेली.

आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव सध्या मिंधे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये लाखोंचा ‘टीडीआर’ घोटाळा करून ‘अदानी’वर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. सरकारने या प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करूनही धारावीकरांना फक्त 300 फुटांची जागा देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा धारावीत राहणारे भूमिपुत्र धारावीकर रहिवाशी देशोधडीला लागणार आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने धारावीकरांच्या हक्काच्या लढय़ासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी टी जंक्शन ते बीकेसीमधील अदानी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि भाजपच्या दलाली आणि सुपारीबाजीचा पर्दाफाश केला. यावेळी लाखोंचा जनसागर या मोर्चात उतरला होता. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतली आहे त्यांना हे दृश्य दाखवा. हा ताकदीचा अडकित्ता, खलबत्ता आहे. यामध्ये सुपारीबाजांना असे ठेचून टाकू की पुन्हा दलाली, अदानीचे नाव घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सब भूमी अदानी की होऊ देणार नाही!

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली स्वच्छतागृहांपासून बाथरूम, नाले, ओढे यांचाही टीडीआर अदानीला देऊन टाकला आहे. केवळ ढगांचा टीडीआर देणे बाकी ठेवलेय. संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे  भाजप म्हणजे ‘भारतीय जुगारी पार्टी’ आहे. म्हणे आम्ही टीडीआर लॉबीची बाजू घेतोय. हिंमत असेल तर बिल्डरच्या फायद्याचा एक तरी जीआर आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले. सध्या ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे सब भूमी अदानी की’ असे चालले आहे. मात्र आम्ही सब भूमी अदानी की होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अदानीला दिलेल्या सवलतींचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे हा लढा केवळ  धारावी, मुंबईचा राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे, असेही ते म्हणाले. अदानीच्या फायद्यासाठीच अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यांना जेव्हा कळले की हा जोपर्यंत बसला आहे तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही, त्यासाठीच हे कटकारस्थान केल्याचा गौप्यस्पह्टही त्यांनी यावेळी केला.

हे पाप देवेंद्र फडणवीसांचेच

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण कधी धारावीचा गळा घोटणारा जीआर काढला नाही. जे 2018 चे उदाहरण देतात त्यावेळी आम्ही फक्त तुमच्या सोबत होतो. हे पाप देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना विकासाविरोधात नसल्याचेही ते म्हणाले.

बूट काय असतो हे जनता दाखवेल

सध्या सबकुछ अदानीकडे असे चालले आहे.  650 एकरची धारावी अदानीकडे. 350 एकरचे देवनारही अदानीला देण्याचा डाव आहे. मोतीलाल नगर, नवीन विमानतळ दिलेले आहेच. मिठागर, रेक्लमेशन, अभ्युदयनगर अदानी आणि आदर्शनगरही अदानीला देणार असल्याचे समजते. त्यामुळे हे केवळ सूटबुट की सरकार है, असा टोलाही त्यांनी लगावला. पण यापुढे असे चालणार नाही. बूट काय असतो हे जनता दाखवेल. धारावीत बूटही बनतात. तसेच धारावीत लोणची-पापड बनतात. जास्त नादी लागात तर पापडासारखे लाटून वाळत टाकू, असा सणसणीत इशारा देतानाच तुम्ही अदानीचे बूट कशासाठी चाटता, असा टोलाही त्यांनी लगावला.

धारावी अदानीला शरण जाणार नाही

कोरोना संकटात दिल्लीत पह्न यायचे की, मुंबईचे काय होणार, धारावीचे काय होणार. मात्र धारावीने कोरोनाला हरवले. त्यांचे फक्त थाळय़ा वाजवणे. गो कोरोना गो, कोलांटउडय़ा मारा, दिवे लावणे सुरू होते, असेही ते म्हणाले. कोरोनाला हरवणारी धारावी अदानीला शरण जाणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या कोरोनात आम्ही कोणाला पात्र-अपात्र न ठरवता काम केले. त्यामुळे आताही कोणालाही अपात्र न ठरवता आहे त्या ठिकाणी घर द्या, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, आमदार संजय पोतनीस, विलास पोतनीस, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, सुनील शिंदे, ऋतुजा लटके, ठाणे जिल्हाप्र्रमुख केदार दिघे, विभागप्रमुख महेश सावंत, सुरेश पाटील, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे संघटन सचिव दिनेश बोभाटे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आणि ‘धारावी बचाव’ आंदोलनाचे सदस्य बाबूराव माने, काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाकपचे प्रकाश रेड्डी, शेकाप आणि ‘धारावी बचाव’ आंदोलनाचे समन्वयक राजेंद्र कोरडे, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोश, भाकपचे मिलिंद रानडे उपस्थित होते.

ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतली आहे त्या दलालांना, सुपारीबाजांना मी सांगतोय, हा किती मोठा अडकित्ता, खलबत्ता आहे ते पाहा एकदा. तुमची दलाली अशी चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदानीचे नाव घेणार नाही.

प्रश्न अदानीला, उत्तर सरकार देते!

गद्दारांना पन्नास खोके कमी पडल्यामुळे हे आता धारावी आणि मुंबई गिळायला निघाले आहेत. यांची मस्ती वाढत चालली आहे. या असंविधानिक सरकाला वाटते की, यांना कुणी जाब विचारू शकत नाही. पण अदानीला प्रश्न विचारला की, उत्तर मात्र सरकार देते, प्रश्न विचारणाऱयांना निलंबित करते. म्हणजेच हे सरकार ‘आपल्या दारी’ नाही, तर ‘सरकार अदानीच्या दारी’ आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

फटकारे

– मुंबईला ठेचून सगळं काही गुजरातला न्यायचं हा त्यांचा डाव आहे

– ही मुंबई आम्ही कमावलेली आहे! याद राखा आमच्या मुंबईला हात लावला तर…

– तुमच्याकडे ऑफिस असेल, पण ऑफिसला येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत. रस्त्यावरची ताकद काय आहे हे दाखवून देऊ.

– आम्ही कुठे विरोध करतोय? आमची मागणी एवढीच आहे की, धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे.

– सुपारीबाजांना सांगतोय; मुंबईकरांचा अडकित्ता, खलबत्ता माझ्याकडे आहे. कुटून टाकू तुम्हाला.

– कोरोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का?

–  विकास म्हणून धारावी अदानीच्या घशात घालताय, त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार?

–  पोलीस बांधवांनो, सरकार येतं आणि जातं. पण तुमचा रेकॉर्ड खराब करून घेऊ नका.

जुनी पेन्शन लागू करणारच

धारावी खाडी होती तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती. मी आता सरकारी कर्मचाऱयांच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा देऊन आलोय. आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबरीने वांद्रे वसाहतीमधील आहे त्याच ठिकाणी घर देण्याचा निर्णय आम्ही महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. हिंमत असेल तर त्या निर्णयाची अंमलबावणी करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले

गुजरातला पळवलेले उद्योगधंदे परत आणा सुरतला नेलेले आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीत हवंय!

मुंबईला ठेचून टाकण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. वर्ल्ड कपची फायनलही त्यांनी गुजरातला नेली. या एका दिवसात मोठी उलाढाल झाली. हिंदुस्थान हरत असताना काही जण हसत होते हे आम्ही पाहिलंय. हिंदुस्थान जिंकेल की नाही याचे त्यांना देणे घेणे नव्हते. फक्त किती पैसे जमले याचा विचार ते करत होते. या सामन्यात जी उलाढाल झाली ती मुंबई, महाराष्ट्राला मिळाली असती ते त्यांना नको होते. फॉक्सकॉन प्रकल्प यांनी गुजरातला पळवला, व्यापारी केंद्र पळवले. सगळंच नेत आहेत. मुंबईचा चोथा करून नासून टाकायची असा यांचा डाव आहे, असा घणाघात करतानाच गुजरातला पळवलेले उद्योगधंदे परत आणा. सुरतला नेलेले आर्थिक पेंद्र मला माझ्या धारावीत हवंय, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

भारतीय जुगारी पार्टी अदानीची बाजू मांडत आहे. देवेंद्र आणि पंपनी म्हणते, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. हे साफ झूठ आहे. धारावीचा गळा घोटण्याचे पाप फडणवीसांचे आहे. तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी?

सूटबूट की सरकार आहे! सूट तुम्हाला आणि बूट आम्हाला असं जर केलंत तर बूट काय असतो हे धारावीची जनता तुम्हाला दाखवून देईल. धारावीत चपला बनतात… लोणची आणि पापडही बनतात… जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून वाळत टाकू उन्हात तुम्हाला…

धारावीतील संडास, बाथरूम सगळय़ांचा ‘टीडीआर’ अदानीला देऊन टाकला आहे. फक्त पाऊस पाडणाऱया ढगांचा ‘टीडीआर’ देण्यात आला नाही. कारण बिनसवलतीच्या ढगांचा पाऊस एवढा पाडला आहे की, आणखी ढगांची गरज नाही.