आता गद्दारांच्या खुर्चीला मशाल लावायची वेळ आली! उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण

हिंगोली मतदार संघातील सहाही ठिकाणी मी दौरा केलेला आहे. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं. मात्र आता आपला उमेदवार व आपली निशाणी मशाल ठरली आहे. ही मशाल आता गद्दारांच्या खुर्चीला लावायची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे व भाजप गटावर निशाणा साधला. गोली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी आज हदगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रणरणत्या उन्हात जंगी सभा झाली.

”गद्दारांनी विधानसभेत गद्दारी केली. त्यावेळी त्यांना वाटलं की आपण मोठं शौर्य काहीतरी केलं. नागेशला पाडलं आणि जवळगावकरांना निवडून दिलं. आम्ही जवळगावकरांनांच जवळ केलं. आता कुठे जातील. आता यांचा सर्व सुफडा साफ होणार आहे. जे मस्तीत आहेत. गुंडागर्दी करतायत. शेतकऱ्यांना यांच्या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावा लागणार आहे. नांगर फिरवून यांची गुंडागर्दी नामशेष करुन टाकायची. हिंगोली हा म्हणजे आमचा बालेकिल्ला आहे. ज्यांच्यासोबत आपण लढत होतो. ते काँग्रेस राष्ट्रावादी आता आपल्यासोबत आलेले आहेत. 90 टक्के मतदान आपल्या नागेशला होईल”, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

”मविआचं सरकार होतं तेव्हा आम्ही जे बोललो ते करून दाखवलेलं. सोयाबिन व कापसाला भाव देऊन दाखवला होता. मी पहिल्याच अधिवेशनात कर्जमुक्ती केलेली. त्या पलीकडे जाऊन नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी सुरुवात केली होती. त्याच वेळी या गद्दारांनी हरामखोरगिरी करत आपलं सरकार पाडलं. यांनी गद्दारी केली नसती. पाच वर्षाच्या अखेरीस मी आणखी य़ोजना जाहीर केली असती. कदाचित मी पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. शेतकऱ्यांच्या मनात एक भीती आहे. मोदींना माहित नाहीए भाजप भाजप करताय तो बोगस भेकड जनता पार्टी झाली. या चोरांचा हिशोब चुकवल्याशिवाय राहणार नाही.

”सुरतेत यांनी यांची घरगडी यंत्रणा वापरून भाजपचा उमेदवार निवडून चमत्कार केला. नुकतंच मला एका शेतकऱ्याने विचारले की शिवसेनेच्या सात बाऱ्यावर गद्दारांचं नाव लिहलं तसं जर आमच्या सात बाऱ्यावर यांनी दुसऱ्याचं नाव लिहलं तर आम्ही काय करायचं. असं झालंच. तर काय कराल? शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिलं नव्हतं. मग आता कुणाकडे तुम्ही दाद मागणार. सर्व दरवाजे बंद केले आहेत यांनी. मात्र महाराष्ट्राचा सात बारा यांच्या बापाच्या मालकीचा नाही. मोदी शहांना वाटत असेल की ही इथली सगळी गोरं ढोरं आहे. यांनी बैल बघितला पण बैलाची शिंग नाही बघितली. आला अंगावर तर घेतला शिंगावर हा महाराष्ट्राचा खाक्या आहे. त्यामुळे आता हा महाराष्ट्र तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

”आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करतायत. हो आहे मी घराणेशाहीमधला आहे. पण तुम्हाला माझ्या वडिलांचे फोटो चोरावा लागतो. आज त्यांना कळलंय की शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला. पण यांना मोदींच्या चेहऱ्यावर मत मागू शकत नाही. गेल्या वेळचा गद्दाराला मीच उमेदवारी दिली. हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला सांगत होते की मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले तर आता का बाळासाहेबांचा फोटो का लावताय. मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाहीए. शहांचं तर बिलकूल चालत नाही. पत्ताच नाही त्यांचा. शहांचा आणि महाराष्ट्राचा काहीच संबंध नाही. उगाट टिकोजीराव फणा काढतात. आणि मणिपूरमध्ये शेपट्या घालतात. चीन लडाखमध्ये घुसतोय तिथे काही बोलत नाही आणि इथे येऊन काय काय केलं ते सांगताय. मणिपूरच्या स्त्रियांची अब्रू वाचवू शकलात का? कुस्तीपटूंकडे जायला वेळ नाही पण समुद्राच्या तळाशी जायला वेळ आहे. पण या सर्व महिलांशी बोलायला वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मशाल गीतातील भवानीचा उल्लेख काढणार नाही

देशाचा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा घरगडी बनला आहे. या आयोगाने शिवसेनेच्या मशाल गीतातील जय भवानी, जय शिवाजी या शब्दांवर आक्षेप घेतला आहे. बजरंगबली की जय, जय श्रीराम अशा घोषणा तुम्ही देता तेव्हा या आयोगाचे कान बंद असतात का? महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या भवानीचा तुम्हाला एवढा आकस का? काहीही झाले तरी गाण्यातील जय भवानी, जय शिवाजी हे शब्द कदापि वगळणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितले.

जेवढा मोठा घोटाळा तेवढे मोठे पद

भाजप हा भेकडांचा पक्ष आहे. भ्रष्टाचार्‍यांना अंगाखांद्यावर घेऊन मिरवणारा हा भाजप! २०१९ च्या निवडणुकीत याच मोदींनी अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणात ‘डीलर’ अशी टीका केली होती. आता त्याच अशोक चव्हाणांचे गुणगान करत आहेत. जेवढा मोठा घोटाळा तेवढे मोठे पद अशी स्कीमच आहे! आदर्श घोटाळा केला, त्यांना राज्यसभा मिळाली. सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाराला उपमुख्यमंत्रीपद! मुख्यमंत्रीपदाचा घोटाळा तर केवढा मोठा असेल! त्यामुळे आता लोकशाही की हुकूमशाही याचा विचार करण्याची गरज अाहे. चारशेपार म्हणजे घटनाबदलाची धोक्याची घंटा आहे. हा धोका वेळीच ओळखा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

ही माझी गॅरंटी आहे

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला. आता आपले सरकार आले की सर्वात अगोदर राज्यातून गुजरातला पळवण्यात आलेले उद्योग पुन्हा परत आणणार, महागाई कमी करणार तसेच शेतमालाला हमीभाव देणार… ही माझी गॅरंटी आहे! आहे का तुम्हाला विश्वास, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने वज्रमूठ आवळून ग्वाहीच दिली!

हिंगोलीतील गुंडागर्दीवर नांगर फिरवा

हिंगोली जिल्ह्यात गुंडगिरी वाढल्याचा उल्लेख इतर वक्त्यांनी केला होता. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी गुंडगिरी वाढली आहे आणि ती कशी संपवायची हे हिंगोलीकरांना सांगण्याची गरज नाही. या गुंडगिरीवर नांगर फिरवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

चारशेपार गेले तर घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवताना आम्ही भाजपला साथ दिली. पण आता ते लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही आणण्याच्या तयारीत आहेत. चारशेपार जागा तुम्हाला हव्यात कशाला? भाजपला चारशेपार जागा मिळणारच नाहीत. पण तसे झालेच तर देशाची घटना बदलल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.