लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा; मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग परत आणणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा आज प्रसिद्ध केला. शेतकऱयांचे उत्पन्न वाढवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यासह गरीब आणि सर्वसामान्यांचे जीवनमान सुकर करण्यास शिवसेनेने प्राधान्य दिले आहे. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आश्वासन देतानाच नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग इंडिया आघाडीचे सरकार येताच पुन्हा महाराष्ट्रात परत आणू असे वचनही शिवसेनेने दिले आहे. देशातील हुकूमशाही संपवण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून संघराज्य पद्धती राबवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजप आणि मोदींची एकाधिकारशाही मोडीत काढून इंडिया आघाडीचे सरकार देशात संघराज्य पद्धती अधिक बळकट करणार आहे. काळ्याकुट्ट राजवटीची अखेर आता जवळ आली आहे. लोकशाही आणि संविधानावरील संकट सजग आणि स्वाभिमानी जनताच दूर करणार आहे!

मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र उभारणार

महाराष्ट्रावरील आकसापोटी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबाद येथे हलविण्यात आले. इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करेल आणि राज्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर पक्ष भ्रष्ट आहेत म्हणणाऱया भाजपाचा निवडणूक रोखे घोटाळा हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरला. अजून पीएम केअर फंडाचा महाघोटाळा बाहेर यायचा आहे. तो कधी बाहेर येणार याचीच सगळे वाट पाहत आहेत.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवणार

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजपा सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सातत्याने झुलवत ठेवले आहे. राज्यातील ओबीसी समाजही आरक्षणावरून आक्रमक आहे. धनगर, कोळी तसेच भटके-विमुक्त्यांच्या मागण्याही प्रलंबित आहेत. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढविण्यासाठी आग्रह धरणार.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र वर्षानुवर्षे केंद्रातील मोदी सरकारकडे प्रयत्न करतोय. परंतु महाराष्ट्र व मराठीवरच्या आकसामुळे मराठी माणसाची ही न्याय्य मागणी मंजूर होत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे आणि आमचे सरकार येताच त्याला विशेष प्राधान्य देईल.