हिंमत असेल तर निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याबाबत बोला; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सरकारी यंत्रणा आणि सरकारी पैशांचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करत आहेत. जनतेला खोटी आश्वासने देत आहेत, जनतेची दिसाभूल करत आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा आणि सरकारी पैशांचा वापर करत प्रचार करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे, त्यामुळे भाजपवर निवडणूक आय़ोगाने कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर करत, सरकारच्या खर्चाने निवडणुकीचा प्रचार करण्यात येत आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान आणि कोणतेही मंत्री पदावर नसतात. ते सर्वसामान्य नागरिक आणि निवडणुकीतील उमेदवार असतात. त्यामुळे निवडणुकीतील त्यांचा खर्च पक्षाच्या खात्यात किंवा त्यांनी स्वतः करणे अपेक्षित असते. मात्र, भाजपकडून प्रचारासाठी सरकारी यंत्रणाचा वापर करण्यात येत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे भाजपवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, ती होण्याची शक्यता नाही.

नरेंद्र मोदी यांचा एक दौरा सुमारे 25 कोटींचा असतो. आचरसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठीच आहे का, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तृणमूल काँग्रेस अशा पक्षांना नोटीस पाठवण्यात येते. मात्र, नरेंद्र मोदींना कोणतीही नोटीस पाठवण्यात येत नाही. सध्या देशात अशाप्रकारची लोकशाही आहे. मुंबईत 10 जनसभा घ्या किंवा 50 घ्या, मुंबईकरांनी निर्धार केला आहे की, ‘इस बार भाजपा मुंबई से तडीपार’. देशातून भाजप तडीपार होणारच आहे, त्याची सुरुवात मुंबईपासून होईल. त्यांनी मुंबई लुटण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मुंबईतील सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली. मुंबई लूटून गुजरातला नेण्याचे त्यांचे उद्योग सुरू आहेत. असे असताना पंतप्रधान मुंबईत येऊन काय सांगणार, असा रोखठोक सवालही त्यांनी केला.

धारावीसह मुंबई अदानीला विकण्याचा त्यांचा डाव आहे, त्यामुळे मुंबईकरांनी भाजपला मते का द्यावी, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी मुंबईत यावे, ते पंतप्रधान आहेत, असे त्यांना वाटते. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यावर ते काळजीवाहून पंतप्रधान आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. पदावर असल्याप्रमाणेच सरकारी खर्चातून त्यांचे दौरे सुरू आहेत. आश्वासने देणे, दबाव टाकणे आणि धमकावणे अशा गोष्टी सुरू आहेत, मात्र, त्या चालणार नाहीत, अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

महाराष्ट्रात आणि देशात जागावाटपाची चर्चा संपली आहे. आता आम्ही प्रचारासाठी तयार आहोत. आता कोणाला चर्चा करायची असेल, तर 2029 च्या निवडणुकीसाठी किंवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात आता जागावाटपावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणारच, असे मोदी यांनी मेरठ येथील सभेत सांगितले. हा मोठा विनोद ते दररोज करत आहेत. जॉनी लिव्हरनंतर हे गुजरातचा लिव्हर जनतेचे मनोरंजन करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, असे मोदी म्हणतात आणि त्यांच्या आजूबाजूलाच 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले दिसतात. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी 5 भ्रष्टाचारी नेत्यांचा समावेश होत आहे. ते दिग्गज भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार, ते तुमच्यासोबत फिरतात, तुमच्या आजूबाजूला वावरतात. त्यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची फाईल बंद करण्यात येते. देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष म्हणजे भाजप आहे. इलेक्टोरल बाँडबाबत त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. हिंमत असेल तर या निवडणूक रोख्यांच्या भ्रष्टाचारावर बोला, असे आव्हानही त्यांनी दिले. जे पैसे जनतेला द्यायचे होते, ते सर्व भाजपच्या खात्यात गेले आहे. त्यामुळे हा जुमला नसून जुमल्यांचा बाप आहे. जनतेला मूर्ख बनवण्याचे आणि फसवणूक करण्याचे, जनतेची दिशाभूल करणाचे काम ते करत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.