ईडी, सीबीआय ही त्यांची हत्यारे बोथट ठरतील! संजय राऊत यांनी ठणकावले

शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना 22 जागा लाढवणार असून इतर उमेदवारांची घोषणा दोन दिवसात करण्यात येईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीत कोणताही तिढा नसून सर्व निर्णय चर्चेतून घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आम्ही लढवय्ये आहेत, आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी भाजप आणि सरकारला सुनावले.

लोकसभा निवडणुकासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकून 22 जागा लढवणार आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरीत 5 उमेदवारांची घोषणा दोन दिवसात करण्यात येईल. त्यात पालघर, कल्याण डोंबिवली, मुंबई उत्तर,हातकणंगले या जागांचा समावेश आहे. या जागांसाठी आमचे उमेदवार निश्चित झाले आहे. त्यांच्या नावाची घोषणा दोन दिवसात करण्यात येईल. हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पांठिबा मागितला आहे. ती जागा शिवसेनेकडे आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेणार आहेत. महाविकास आघाडीत कोणत्याही जागेवरून तिढा नाही. शिवसेनेने ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यामुळे कोणताही तिढा किंवा वाद नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

रामटेक ही आमची जागा असून या ठिकाणी पाच ते सहा वेळा आमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्या जागेवर आम्ही सातत्याने लढून जिंकत आहोत. त्या जागेवर काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केला. त्यावर आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. चर्चेतून त्या जागेचा प्रश्न सुटला होता. त्या जागेऐवजी आम्ही ईशान्य मुंबईची जागा लढू, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र निर्णय घेतले आहेत. त्याप्रमाणे आम्ही उमेदवार जाहीर करत आहोत. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजमध्ये प्रचारसभा घेतली. तेथील सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागा नाहीत. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा आहे. त्याठिकाणी आम्ही 30 वर्षे लढत आहोत. छत्रपती शाहू महाराज ही जागा काँग्रेसच्या चिन्हावर लढवत असल्याचे समजताच आम्ही ही जागा काँग्रेससाठी सोडली. त्यामुळे महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेतून सांगलीची जागा आम्हाला देण्यात आली. त्यामुळे जागावाटपाचा विषय संपलेला आहे, त्यात कोणताही तिढा किंवा वाद नाहीत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याशी अजूनही चर्चा होऊ शकते अशी आमची महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची भूमिका आहे. देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असावेत, असे आम्हाला वाटते. विजयी होणाऱ्या जागा असे काही नसते. प्रत्येक जागा जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राज्यातील 48 जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक जागा लढून आम्ही जिंकणारच आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक असतात. त्यामुळे कोणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. इच्छिकांमधून चर्चेनंतर एकच नाव निश्चित करण्यात येते. एकालाच उमेदवारी देण्यात येते. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपण कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. दिल्लीचा कारभार तुघलकी पद्धतीचा, औरंगजेबी पद्धतीचा आहे, असे म्हणणे यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे. याला हुकूमशाही म्हणतात. हिटलरशाही म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात आहोत, आम्ही औरंगजेबी कारभार म्हणतो. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे, त्यांनी कारभारात सुधारणा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीत जे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत होत आहे, तेच महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसबाबत होत आहे. मात्र, अमोल किर्तीकर किंवा आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. तुम्ही ईडी, सीबीआय किंवा आणखी काही लावा, ही तुमची हत्यारे भविष्यात बोथट ठरणार आहेत. केजरीवाल हे तुरुंगातून मुख्यमंत्रीपदाचे काम पाहत आहेत. त्यांची लोकप्रियता नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे. अमोल किर्तीकर यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे. आम्ही डरपोक नाही. जे डरपोक होते ,ते पळून गेले. आम्ही लढणारे आहोत. अमोल किर्तीकरदेखील लढणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांची उमेदवारी बदलण्यात येणार नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.