माळशिरसमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. 15 ते 20 दिवसांतून येणारा पाण्याचा टँकर अपुरा पडत आहे. गावातील महिलांना कुटुंबाची तहान भागविण्यासाठी हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम दुष्काळी भाग. हा भाग सतत निवडणुकीच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेक आमदार, अनेक खासदार होऊन गेले; पण माळशिरस तालुक्यातील पश्चिम भाग पाण्यापासून वंचितच राहिला. विकासापासून कोसो दूर; तर पाण्यावाचून तहानलेला. वकीलवस्ती, पाटीलवस्ती, चव्हाणवस्ती, भांबेवस्ती, सुळकी, रेडे, जळभावी, गारवाड, मगरवाडी, चिकाटेवस्ती, शिंगटेवस्ती या गावांमधील नागरिक वर्षानुवर्षे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला, तरीही त्यांना असलेल्या मर्यादेमुळे पंधरा ते वीस दिवसांतून एकदा या गावांमध्ये टँकर येतो. टँकरची वेळही निश्चित नाही. रात्री-अपरात्री कधीही टँकर येत असल्याने नागरिकांना रात्रीचा दिवस करून टँकरची वाट पाहावी लागत आहे.

पुढारी फक्त मते मागण्यासाठी गावात येतात. पाणी देऊन दुष्काळ संपवू, असे आश्वासन देत निवडून जातात. एकदा निवडून गेले की, पुन्हा पाच वर्षांनीच तोंड दाखवतात, असा संताप गावकरी व्यक्त करीत आहेत.

ग्रामस्थांची वाढीव पाण्याची मागणी प्रांत कार्यालयाला पाठविली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गारवाडच्या बाजूच्या तळ्यातील गाळ ज्यांना घेऊन जायचा आहे, अशा शेतकऱयांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्ज करावेत.

– विनायक गुळवे,
गटविकास अधिकारी, माळशिरस