सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलचा निसटता विजय

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकारी पॅनलचा विजय झाला आहे. त्यांना 11 जागा ताब्यात घेण्यात यश आले, तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला 8 जागा मिळाल्या.

निवडणुकीत शिवसेनेला तीन, काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन अशा महाविकास आघाडीच्या आठ जागांवर विजय मिळवता आला. निवडणुविजयी संचालक उमेदवारांमध्ये भाजपचे अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, मनीष दळवी, गजानन गावडे, महेश सारंग, संदीप परब, समीर सावंत, प्रज्ञा ढवन, रवींद्र मडगावकर यांचा समावेश आहे, तर शिवसेनेचे सुशांत नाईक, गणपत देसाई, विद्याधर परब, काँग्रेसचे मेघनाद धुरी, नींता राणे, व विद्या प्रसाद बांदेकर, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डान्टस व आत्माराम ओटवणेकर अशा आठ संचालकांनी विजय मिळविला.

जिल्हा बँक निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्यानंतर तेली यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत यापुढे भाजपचा एक सर्कसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे तेली यांनी सांगितले.