सोलापूर जिह्यात ‘आरोग्य’ची बोंबाबोंब, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारभाराचे भाजपने काढले वाभाडे

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सोलापूर जिह्यातच आरोग्य विभागाची बोंबाबोंब झाली आहे. ‘स्टाफ नाही, औषधे नाहीत, इमारती नाहीत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत’, असे वाभाडे भाजपच्या आमदारांनीच काढल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे जाहिरातबाजी करून कामात लुडबूड करीत आहेत, अशी तक्रारही भाजप आमदारांनी केली.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या आमदारांनी आरोग्य विभागाला लक्ष्य करीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.

जिह्यातील आरोग्य यंत्रणा साफ कोसळली असून आरोग्याची बोंबाबोंब आहे, असा आरोप भाजप आमदार विजय देशमुख यांनी केला. डीएचओ तर काहीच कामाचे नाहीत, ते सतत निगेटिव्ह उत्तर देतात, त्यांना बदलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते म्हणाले, ‘तालुक्यात दवाखाने आहेत; पण कुलूपबंद आहेत. अनेक ठिकाणी स्टाफ नाही, औषधांचा तुटवडा आहे. कोटय़वधी रुपयांच्या इमारती धूळ खात पडून आहेत. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर-मंगळवेढय़ाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढय़ात मोजक्याच ठिकाणी दवाखाने चालू आहेत, इतर आरोग्य केंद्रे स्टाफ, डॉक्टर व औषधे नाहीत म्हणून बंद असल्याचा आरोप केला. या चर्चेदरम्यान माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्य विभागाची बिघडलेली स्थिती चव्हाटय़ावर आणली.