विरोधकांच्या बैठकीसंदर्भात मोठी बातमी; सोनिया गांधी-राहुल गांधींकडून विरोधी पक्षांना दिले जाणार विशेष जेवणाचे आमंत्रण?

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही 18 जुलै (मंगळवार) रोजी बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये आम आदमी पार्टी (आप) सह 24 पक्षांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधकांची वज्रमुठ तयार होताना दिसत आहे. एकजुटीने लढा देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीच्या एक दिवस आधी सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी ‘स्नेहभोजन’ देखील आयोजित करण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत 15 हून अधिक पक्षांची पहिली विरोधी बैठक झाली. त्याचवेळी सोमवारी होणाऱ्या बैठकीत आठ नवीन पक्ष सामील होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

यामध्ये मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK), कोंगू देसा मक्कल काची (KDMK), विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणी) यांचा समावेश आहे.

2014 च्या निवडणुकीत केडीएमके आणि एमडीएमके हे भाजपचे सहयोगी होते ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमीका बजावली.