मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूल, अद्ययावत होणार, शिवसेनेच्या मागणीवर सरकारचे आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या कलिना पॅम्पसमधील क्रीडा संकुलात असलेल्या स्वीमिंग पूल आणि मैदाने अद्ययावत करण्यात येतील असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिले. शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात हा मुद्दा लावून धरला होता.

शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलातील इनडोअर मैदानांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, बास्केटबॉल आदी खेळ खेळता येत नाहीत. मैदानातील टाईल्स आणि फ्लोरिंग उखडले गेले आहे असे पोतनीस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्वीमिंग पूलही देखभालीअभावी अनेक वर्षे बंद आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाने हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बंद करून ती जागा इतर बाबींसाठी वापरण्याचा घाट घातला असे पोतनीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार सुनील शिंदे यांनी यावेळी या क्रीडा संकुलातील देखभालीचे काम तज्ञांकडे दिले जावे अशी मागणी केली.

 विद्यापीठ संकुलातील जलतरण तलावाचे इतर कुठच्याही बाबीसाठी वापर केला जाणार नाही तसेच इनडोअर मैदान व इतर खेळाच्या मैदानांतील सर्व सोयीसुविधा अत्याधुनिक केल्या जातील असे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल येथे संबंधित आमदारांसह प्रत्यक्ष भेट घेऊन सदर सोयीसुविधा अद्ययावत करण्यासाठी आराखडा तयार केला जाईल असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.