घटनाबाह्य खोके सरकार महाराष्ट्राच्या हिताचे काम करतेय की शेजारच्या राज्याच्या हिताचे? आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात पालकमंत्र्यांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आल्या आहेत, तसेच काही जिल्ह्यात रुग्णांचे बळी जात आहेत. असे असताना सरकार आपल्याच राजकारणात मश्गुल आहे. राज्यातील गंभीर बाबींकडे लक्ष वेधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी मिंधे सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला आहे. आपण मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले होते, आपल्या आव्हानाबाबत समजताच मुख्यमंत्री दिल्लीला पळाले, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

राज्यात काल नव्याने पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. रायगडच्या पालकमंत्र्यांबाबत आपल्याला अद्याप माहिती मिळाली नाही. पुण्यामध्ये भाजपने स्वतःच्या पालकमंत्र्यांना हटवून बाहेरून आणलेल्यांकडे पालकमंत्रीपद दिले आहे. पालकमंत्री जाहीर करणे, या प्रशासकीय बाबी आहेत. मात्र, त्यापलीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासारख्या जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात अनेक निरपराध रुग्णांचे बळी गेले आहेत. ही धक्कादायक बाब आहे. या गंभीर बाबीवर कोणीही बोलायला तयार नाही, असे ते म्हणाले.

धरण खेकडे फोडतात, असा दावा करणाऱ्या मंत्र्यांना हाफकीन दलाल वाटते. त्यामुळे हाफकीनसारख्या संस्थेला बाजूला ठेवत एक नवी समिती बनवण्यात आली आहे. सुमारे 700 ते 800 कोटी रुपये वापराविना पडून आहेत. सायन आणि केईएम रुग्णालयांचा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांच्या डीनवर प्रंचड दबाव आहे. तुम्ही तुमच्या खर्चाचे बघा, सीएसआरमधून औषधे घ्या, आयव्ही फ्लुएडचे तुम्हीच बघा, एक्स रे, सोनोग्राफी या सुविधांबाबत काहीच माहिती नाही.अशी परिस्थिती सरकारी रुग्णालयात आहे. या गंभीर बाबींकडे कोण लक्ष देणार, असा सवालही त्यांनी केला.

राज्यात पैशांची उधळपट्टी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक विकासकामांना मिंधे सरकारने दिलेली स्थगिती उठवण्याची गरज आहे. आमदारांचा निधी, माजी नगरसेवकांचा निधी या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हे सर्व सुरू असताना आता वेदांचा फॉक्सकॉन परत येणार आहे का, एअरबस प्रकल्प परत येणार आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. सत्तेवर असलेले घटनाबाह्य खोके सरकार राज्याच्या हिताचे जनहिताचे काम करत आहे की शेजारच्या राज्याच्या हिताचे काम करत आहे, या प्रश्नाचे त्यांनी उत्तर देणे गरजेचे आहे.

आपण मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले की, या समोरासमोर बसू, वेदांता, एअरबस प्रकल्प, सरकारी रुग्णालयातील मृत्यू याबाबत चर्चा करू. मात्र, आपले आव्हान समजताच ते दिल्लीला पळाले आहेत. या सरकारची नियुक्तीच चुकीची आहे, हे सरकार बेकायदेशीर असून ते जाणे गरजेचे आहे. त्यामुळे एखाद्या नियुक्तीच्या विषयावर न बोलता, बेकायदेशारी सरकारला हटवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडावाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असलेल्या भाजपशी आमची मैत्री होती. त्यावेळचे भाडपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्यांचे काय, त्यांच्यावर अन्याय का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आता वॉशिंग मशीनमधून स्वच्छ केलेल्यांना ते डोक्यावर घेऊन फिरत आहेत. मात्र, कर्नाटकात, मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले जनतेने निवडून दिलेले सरकार पाडून यांनी यांचे बेकायदेशीर सरकार का आणले, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या सरकारला हटवणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.