तुरुंगात जाईन, पण माफी मागणार नाहीच; सुषमा अंधारे यांचे नीलम गोऱहे यांना संस्कृतमध्ये पत्र

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून नीलम गोऱहे यांचे नाव आले, पण माझ्या या कृतीला अपराध ठरवण्याचे सत्ताधाऱयांकडून प्रयत्न सुरू आहेत. राजकीय कुरघोडी करण्यासाठी खिंडीत पकडून मला झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केला. मला शिक्षा झाली तरी चालेल, पण माफी मागणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावावरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांना संस्कृत भाषेत पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रिय लोकशाही असे नमूद करून या पत्रात सुषमा अंधारे म्हणतात की, घटनात्मक पदाचा अपमान केल्याच्या मुद्दय़ावरून आपल्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे किंवा सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही? असा सवाल त्यांनी या पत्रात उपस्थित केला. राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधले.

माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत. पण निव्वळ विरोधी पक्षाची आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी अजिबात माफी मागणार नाही. कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.