मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘यम आपल्या दारी’… कळवा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; एकाच रात्रीत 18 रुग्णांचे बळी

‘गतिमान कारभार’, ‘सरकार आपल्या दारी’ अशा घोषणांचे ढोल बडवणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र साक्षात ‘यमच दारी’ आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पाच रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे निघाले असतानाच शनिवारी एकाच रात्रीत पुन्हा 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व भयंकर घटना घडली आहे. यात आठ पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आकांत उसळला. अवघ्या 48 तासांत 23 रुग्णांचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याने ठाण्याची आरोग्य यंत्रणा कोमात गेल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या बेफिकिरीचेच हे बळी आहेत, असा प्रचंड संताप ठाणेकरांनी व्यक्त केला आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला 48 तास उलटत नाही तोच शनिवारी रात्री साडेदहा ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात आयसीयूमधील 13 तर जनरल वॉर्डमधील 5 रुग्णांचा समावेश असून या घटनेमुळे हॉस्पिटलच्या बेबंद कारभाराचे पुन्हा एकदा ‘पोस्टमार्टेम’ झाले आहे. कळवा हॉस्पिटल रोजच रुग्णांनी ओव्हरपॅक होत असताना तीनशे कर्मचाऱयांचा तुटवडा आहे. वारंवार मागणी करूनही कर्मचाऱयांची भरती केली जात नसल्याने त्याचा दुष्पपरिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. या रुग्णालयाची पाचशे रुग्ण इतकी क्षमता असताना ठाणे जिह्याच्या विविध भागांतून आलेले सहाशे रुग्ण अक्षरशः काsंबून भरले आहेत. त्यातच डॉक्टरांची अपुरी संख्या, आरोग्य सुविधांचा मोठा अभाव यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णांचे बळी जाऊ लागले आहेत.

कळवा रुग्णालयात रोज रुग्णांचे लोंढे

ठाण्यात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर सध्या नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल मनोरुग्णालयाच्या जागेत हलवले आहे. मात्र याची माहिती ग्रामीण भागातील रहिवाशांना नसल्यामुळे केवळ ठाणे शहरच नव्हे तर पालघर जव्हार, वाडा, मोखाडा, शहापूर, मुरबाड अशा विविध भागांतून रुग्ण मोठय़ा संख्येने कळवा हॉस्पिटलमध्ये येत आहेत. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱयांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

रात्री बारा वाजता अॅडमिट केले; पहाटे चारला महिलेचा मृत्यू

अल्सर असलेल्या एका महिलेला रात्री बारा वाजता कळवा हॉस्पिटलमध्ये तिच्या भावाने अॅडमिट केले. तातडीने ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्याने हे ऑपरेशनदेखील केले. त्यानंतर या महिलेला आयसीयूमध्ये आणले. मात्र काही तासातच पहाटे चार वाजता या महिलेचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला गेला नाही. त्यामुळे कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. कागदपत्रांची पूर्तता करण्यास उशीर होत असल्याचे सांगून मृत महिलेच्या नातेवाईकांना प्रचंड वेदना झाल्या.

पेशंट सिरीयस अवस्थेत आल्याचा दावा

पावसाळ्यातील साथीच्या रोगांमुळे कळवा हॉस्पिटल ओव्हरलोड झाले असून भिवंडी, कल्याण, कर्जत अशा विविध भागातून सिरीयस पेशंट आले. त्यामुळे त्यातील 18 जणांचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू आमच्या दुर्लक्षपणामुळे झाला नसल्याचा दावा कळवा हॉस्पिटलचे डीन अनिरुद्ध माळगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. जे रुग्ण दगावले त्यातील एका रुग्णाला साप चावला होता. महिलेच्या पोटात अल्सर फाटला होता. तसेच आणखी एका डेंगू झालेल्या पेशंटची परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्यामुळेच ते दगावल्याचे माळगावकर यांनी म्हटले आहे. उरलेल्या 15 रुग्णांचा मृत्यू कसा झाला याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते.

शिवसेनेने आयुक्तांना ठणकावले

ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत ते म्हणाले, सिव्हिल रुग्णालय बंद करून ते मनोरुग्णालयात स्थलांतरित केले. पण हे किती लोकांना माहीत आहे? तुम्ही याबाबतची माहिती जनतेला का देत नाही, असा सवालही विचारे यांनी केला. रुग्णालयात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. फाटक्या, मळक्या बेडशीटवर रुग्ण झोपवले जात आहेत ही जबाबदारी कोणाची, असेही त्यांनी ठणकावले.

करोडोंचा निधी कुठे गेला?

हॉस्पिटल रुग्णांनी ओव्हरलोड झाले असेल तर तुम्ही मुख्यमंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांना लेखी का कळवले नाही? 520 बेडच्या रुग्णालयात फक्त 1 सिटी स्पॅन आणि 1 एमआरआय यंत्र असेल आणि रुग्णांना बाकीच्या तपासण्या बाहेरून करावे लागत असतील तर येणारा करोडो रुपयांचा निधी कुठे गेला, असा संतप्त सवाल ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पालिका आयुक्तांना केला. यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, किरण जाधव, विभागप्रमुख प्रतीक राणे, प्रवक्ता अनिश गाढवे, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख चंद्रकांत विधाटे, उपशहरप्रमुख मुपुंद ठाकूर, विभागप्रमुख वैभव शिरोडकर उपस्थित होते.

अश्रू… हुंदके आणि टाहो…

आपले आप्त, नातेवाईक गेल्याचे कळताच कळवा रुग्णालयात सकाळीच नातेवाईकांनी धाव घेतली. इतक्या मोठय़ा प्रमाणावर गर्दी का झाली याची माहिती पत्रकारांनी घेतली असता एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच ठाणेकर हादरून गेले. आयसीयूत 17 रुग्णांना उपचार सुरू होते. त्यापैकी 13 रुग्णांचा तर जनरल वॉर्डमधील 5 रुग्णांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ मृत्यू झाल्याचे जाहीर होत असल्याने रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांचा आकांत सुरू होता. उपचार सुरू असताना अचानक रुग्ण कसा दगावला हेच कुणाला समजत नव्हते, सांगितलेही जात नव्हते. घटनास्थळी काळीज हेलावणारे दृश्य होते. कुणाची आई, कुणाचे वडील तर कुणाची बहीण दगावल्याने संपूर्ण कळवा हॉस्पिटलवर दुःखाची छाया पसरली आहे. रुग्णालयाच्या परिसरात फक्त अश्रू, हुंदके आणि टाहो ऐकू येत होते.

पाच जणांची चौकशी समिती

प्रत्यक्षात काय घडले, कसे झाले आणि कोणामुळे झाले याची चौकशी सुरू करण्यात आली असून आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालक, जे.जे. रुग्णालयाचे नामांकित डॉक्टर यांच्यामार्फत चौकशी करून या घटनेचा अहवाल सादर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

चौकशी समिती आजपासूनच कामाला लागेल

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेची स्वतंत्र चौकशी समिती नेमून त्याचा 48 तासांत अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले. दोषींवर तातडीने कारवाई करा, असे सांगतानाच रुग्णालयात योग्य ती आरोग्य व्यवस्थेची उपाययोजना करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही रुग्णालयास भेट देऊन चौकशी समिती उद्यापासूनच काम करेल, असे सांगितले. हे मृत्यू रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाले असतील तरच मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

पालिकेची नाही, यमराजाची चूक – जितेंद्र आव्हाड

48 तासांत 24 रुग्णांचा बळी जाणे ही ठाणे महापालिकेची किंवा डॉक्टरांची चूक नसेल तर ती यमराजाची चूक असेल, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. डॉक्टरांची कमतरता होती तर महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष का केले. वेळीच भरती का केली नाही, असा सवालही त्यांनी केला. मृत्यू झालेल्या रुग्णांची जबाबदारी महापालिकेने घेऊन प्रत्येक रुग्णाला किमान 50 लाखांची मदत करावी, असे सांगतानाच या संपूर्ण घटनेची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करा, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

मृतांची नावे

झायदा शेख (60, कल्याण), सुनिता इंदुलकर (70, ठाणे), ताराबाई गगे (56, शहापूर), भानुमती पाढी (83, कल्याण), सानदी हसन (66, ठाणे), निनाद लोकूर (52, कल्याण), भास्कर चाबुकस्वार (33, ठाणे), अमरीन अन्सारी (33, भिवंडी), अशोक जयस्वाल (53, उल्हासनगर), भगवान पोतदार (65, ठाणे), अब्दुल रहीम खान (58, गोवंडी), सुनील पाटील (55, ठाणे), ललिताबाई चव्हाण (42, कल्याण), चेतक गोडे (4, शहापूर), अशोक निचळ (81, ठाणे), नूर खान (60, साकीनाका, मुंबई), कल्पना हुमणे (65, शहापूर).

मुख्यमंत्र्यांच्या दारात सुविधांचा अभाव

‘शासन आपल्या दारी’ असा गवगवा करणाऱया मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी मर्यादा येतात. त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ठाण्यात आकांत; मुख्यमंत्री महाबळेश्वरच्या पायथ्याशी विश्रांतीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या ठाण्यात आकांत सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र महाबळेश्वरच्या पायथ्याशी विश्रांती घेत होते. ते कळवा हॉस्पिटलकडे फिरकलेही नाहीत, की त्यांनी या घटनेवर एक शब्दही उच्चारला नाही. शिंदे बोले आणि पालिका हले, असे असताना कळवा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कोमात कशी गेली, या रुग्णालयासाठी येणारे कोटय़वधी रुपये कुठे गेले, बळी गेलेल्या रुग्णांचे पाप कुणाचे? एरवी छोटय़ा-मोठय़ा घटनांचे व्हिडीओ शूटिंग करून मुख्यमंत्र्यांची इमेज बिल्डिंग करण्याचे काम त्यांची पीआर टीम करते. मात्र आता मुख्यमंत्री त्यांच्या पीआर टीमला घेऊन कळवा हॉस्पिटलला का पोहोचले नाहीत, असा सवाल विचारला जात आहे.

शिवसेना आक्रमक; आयुक्तांना घेराव

कळवा हॉस्पिटलमधील दुर्घटनेनंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी तातडीने धाव घेतली व डीन अनिरुद्ध माळेगावकर यांना जाब विचारला, तसेच आयुक्त अभिजित बांगर यांना घेराव घातला. आयुक्त म्हणून तुम्ही काय काम करताय? डॉक्टर, नर्सेस कमी आहेत. पंत्राटदार स्वच्छता करत नाहीत. रुग्णालयात शिरण्याची हिंमत होत नाही. मग रुग्ण तिथे कसे राहात असतील याचा विचार करा, असा संतप्त सवाल खासदार राजन विचारे यांनी केला. कळवा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवण्याची फाईल गेल्या एक महिन्यापासून तुमच्याकडे पडून आहे. त्यावर निर्णय कधी घेणार, अशी विचारणाही त्यांनी केली. कोविड काळात तुम्हाला अधिकार दिले. त्यामुळे हा रोग आटोक्यात येऊ शकला. मग आता महापालिकेत ना स्टॅण्डिंग कमिटी ना महासभा तरीही मनुष्यबळ वाढवण्याची फाईल तुम्ही का क्लिअर करत नाही, असे विचारे यांनी विचारताच आयुक्तांची बोलती बंद झाली.