राज्य आणि देश वाचवण्यासाठी हीच क्रांतीची वेळ; उद्धव ठाकरे कडाडले

नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्याचा चांगलाच समाचार घेतला. भाजपने युती का तोडली, याचे कारणही त्यांनी सांगितले. तसेच या राक्षसांचा संपवण्यासाठी काळारामाप्रमाणे जनतेला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. राज्य आणि देश वाचवण्यासाठी हीच क्रांतीची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या ज्या वेळी धर्मावर अधर्माच संकट आलं आहे , त्यावेळी भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमची आई जगदंबा हिने अवतार घेत राक्षसांचा वध केला. तीच वेळ आता आली आहे. इतके वर्ष आपण प्रतिक्षा केलेला राम मंदिर उद्घाटनाचा तो क्षण काल आपण अनुभवला. तो क्षण याची देही याची डोळा आपण पाहिला याचा मला अभिमान आहे. राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले. त्यावेळेला जे कारसेवक अयोध्येला गेले होते ते इथे उपस्थित आहेत त्यांना मी नमन करतो. काल काळाराम मंदिरात, सावरकरांच्या जन्मभूमीत गेलो होतो. अयोध्या ही प्रभू श्री रामची जन्मभूमी आहे. मात्र, पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्रीरामाची पराक्रम भूमी आहे. आता जिथे मंदिर आहे, तिथे पर्णकुटी होती. तिथे भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तिथे राहिले होते. शूपर्णकेचे नाक आणि कान श्री रामांनीही येथेच कापले होते. त्यानंतर प्रभू श्रीरामांना मारायला 14 हजार राक्षस आले होते. त्यावेळी प्रभू श्री राम चंद्रांनी यांनी अतिभव्य रूप धारण करून त्या राक्षसांचा वध केला होता. तो काळ रूप म्हणजे काळाराम माझ्यासमोर प्रत्यक्षात बसला आहे. राम मंदिराला विरोध करतो असं नाही तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

काल मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. त्यावेळी त्यांनी जे काही केलं होते. ते त्या काळात शेंबड्या वयात असणाऱ्यांना माहितीही नसेल आणि यांची एवढी मजल गेली की शिवसेनेचे योगदान काय, असे ते विचारत आहेत. त्यावेळी सुद्धा यांचे सगळे पळाले होते, माधवराव भंडारी, वाजपेयी व आडवाणीसुद्धा पळाले होते. कुणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी बाबरी पाडल्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. त्यावेळी कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने जे काही केले होते. ते त्या काळात शेंबड्या वयात असणाऱ्यांना काहीही माहिती नाही आणि आता शिवसेनेचे योगदान काय, असे ते विचारत आहेत.आता काहीजण तर शंकराचार्यांचे योगदान काय, असा सवाल करत आहेत. आता बाजारबुणगे आणि भ्रष्टाचारी भाजपत आहे. भाजपात भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे. पण शंकराचार्यांना मान नाही, अशी प्ररिस्थिती आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

भआजप इक्बाल मिर्चीशी संबंध असणाऱ्यांसोबत फिरत आहेत. त्यांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहे. या लढ्यासाठी तयार आहात का, ज्यांना जायचे असेल त्यांनी आताच जावे. 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा, असे बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे ज्यांना जायचे आहे, त्यांनी मिध्यांकडे जावे. त्या शेळ्या आधीच पळून गेल्या आहेत. मंदिर उद्घाटनाची त्यांना एवढी घाई काय झाली होती. शंकराचार्यांनाही ते भेटले नाहीत. राम नवमीपर्यंत ते थांबले असते तर आम्ही पाठिंबा दिला असता. त्यांनी आमचे संरक्षण कवच काढून घेतले आहे. जे आहे ते पण काढून घ्या, आमच्यासमोर आमचे संरक्षण कवच आहे. ते संरक्षणात राहून 56 इंची छाती दाखवात. आमचे शेतकरीच त्यांना जागा दाखवतील. ही जनताच माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. बाळासाहेब यांचे विचार घेत आम्ही पुढे जात आहोत. मात्र, कुठे दंगल झाली की पळून जाणारी त्यांची अवलाद आहे.

ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणा ते आमच्याविरोधात वापरत आहे. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी झाली आहे. असे भेकड हिंदू याआधी कधी झाले नाही आणि होणारही नाही. त्यांचे शक्तीमान नेते सर्वोच्च पदावर असूनही हिंदूना आक्रोश करावा लागत असेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे. आम्ही हिंदूच्या रक्षणासाठी सज्ज आहोत. आता मोदी महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र बघून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील शेतकरी संकटात असताना ते इथे आले नाही. आता मते मागण्यासाठी ते इथे येत आहे. ते मणीपूरला गेले नाही कारण तिथे लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत. तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यामुळे त्यांना आता महाराष्ट्र आठवत आहे, तोक्ते वादळ आले तेव्हा गुजरातला न मागता मदत मिळाली. महाराष्ट्राला ठेंगा दिली. देशासाठी त्यांची मन की बात असते, तर गुजरातसाठी धन की बात असते. असे करून ते देशात विष कालवत आहेत. भेदभाव आणि द्वेष निर्माण करण्याचे ते काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप केला. मात्र, कोणी घरदांज माणासांनी आरोप केला, तर त्याला उत्तर दिले असते. मात्र, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. राज्य हेच माझे कुटुंब आहे. हेच माझे घराणे आहे. मात्र, मोदी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये द्वेष पसरवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. तेथील इंग्रजांची वखार लुटली. आता मोदी आमचा महाराष्ट्र ओरबाडत आहेत. गुजरात समृद्ध करा आम्हाला आनंद होईल, पण त्यासाठी आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारासांठी गेलो, असे मिंधे सांगत आहेत. मात्र, महाराष्ट्र ओरबाडला जात असताना ते शेपूट हलवत बघत बसले आहेत. असे बाळासाहेबांचे विचार नव्हते, असेही त्यांनी ठणकावले.

मोदी कोकणात गेले आणि तेथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला. ते महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत आहेत. नार्वेकर यांच्यात हिंमत असेल तर जनतेत येत शिवसेना कोणाची हे सांगावे. बंद दाराआड बसून त्यांनी खोटेपणा करत निर्णय दिला. कागदपत्रे, घटना मिळालीच नाही असे सांगत आहे. मात्र, ठराव झाला, त्यावेळी तेदेखील बिल्ला लावून उभे होते. त्यावेळी पक्षप्रमुख पद नाही, असे म्हणणारे दाढीवाले माझ्या पाया पडले होते. ते सगळे जनतेने बघितले आहे. आता जनता हीच आमची घटना आहे.

भाजपने शिवसेनेशी युती का तोडली ते त्यांनी स्पष्ट करावे. भाजपच्या एका जबाबदार नेत्याने याचे कारण सांगितले. 2014 मध्ये त्यांनी युती तोडली. आता बाळासाहेब नाहीत, त्यामुळे उद्धव काही करणार नाही, शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही, त्यामुळे शिवसेना संपवून टाकण्याचा विचार दिल्लीत सुरू होता. असे त्या नेत्यांने सांगितले. असे असताना आम्ही 63 आमदार निवडून आणले. त्यासाठी त्या नेत्याने आपल्याला शुभेच्छा देत खूप मोठे काम केले, असे आपल्याला सांगितले. अमित शहा यांनी वचन मोडले, त्यांनी वचन पाळले नाही. ते रामभक्त कसले. त्यांनी वचन पाळले असते तर त्यांचे देवेंद्र फडणवीस पाव नव्हे पूर्ण मुख्यमंत्री झाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने 370 कलम हटवले. आम्ही पाठिंबा दिला. त्यांचे एक निशाण, एक विधान, एक प्रधान असे त्यांचे धोरण आहे. एक निशाण म्हणजे आमचा तिंरगा असेल, भाजपचे फडके नसेल, एक विधान म्हणजे बाबासाहेबांनी दिलेले संविधान असेल, अक प्रधान म्हणजे जनतेने निवडून दिलेला प्रधान असेल. आता जी परिस्थिती आहे ती हुकूमशाहीकडे जाणारी आहे. आम्ही त्यांचे मित्रपक्ष होतो. तराही ते आमच्या मुळावर आले, आम्हाला ते संपवायला निघाले आहेत. हिंदुत्वाचा विचार घेत आम्ही त्यांना दिशा दिली. वापर करत फेकून द्यायचे, हे त्यांचे धोरण आहे. त्यांनी वापर करून फडणवीसांना फेकले. मध्य प्रदेश आणि राजस्थानात शिवराज चव्हाण आणि वसुंधरा राजे यांना दूर केले. आता योगीजी यांनी सावध राहण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लागवला.

आपल्या हक्काच्या गोष्टी ते संपवायला निघाले आहेत. आपली हक्काची शिवसेना ते संपवायला निघाले आहेत. शिवसेना नसती तर काय झाले असते याचा विचार करा. रामलल्लाला ते घर देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना मोदी यांनी काय दिले. उज्ज्वला ग२स देतात पण त्यावर शिजवणार काय, जनतेने काय खायचे, याचे उत्तर त्यांच्याकडे आहे काय. देशाचा पाशिंदा शेतकरी आहे, तो उपासमारीने मरत असेल, तर मोदी यांनी केलेल्या उपासाचा काय फायदा, असा सवालही त्यांनी केला.

आमच्याकडे पर्याय काय असे ते विचारत आहेत. मात्र, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. भाजपकडे पर्याय काय आहे. त्यांच्याकडे एकच शेर आहे, पण आता त्यांचेही कोणी ऐकत नाही. त्यामुळे आता रामाच्या नावावर मते मागत आहे. कर्नाटकातही हुनामाच्या नावाने मते मागितले. पण त्याचा उपयोग झाला नाही. आता राम के नाम नही काम के नाम बोलो, जर त्यांना देवाच्या नावाने मते मागावी लागत असतील तर गेल्या 10 वर्षात त्यांनी काय केले, असा सवालही त्यांनी केला. हे राक्षस त्यांच्या यंत्रणा घेऊन येत आहेत. आता त्यांनी शिवसेना संपवली असे म्हणतात ना, मग आता आमच्यामागे का लागत आहात, आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही सांगू त्या भाजपच्या नेत्यांवर धाडी टाका, किती घबाड मिळेल ते बघा. आम्ही तुमचे साथी, सोबती होतो. तुमची संकटे बाळासाहेबांनी अंगावर घेतली होती, तोच मित्रपक्ष ते संपवायला निघाले आहेत.

लढाईच्या अंतीम क्षणी सामान्यच असामान्य होतो, अशा कुसुमाग्राजांची कवितेच्या ओळीही ऐकवत सामान्य माणसे क्रांती घडवतात. शांती ही मुडद्यांची असते आणि क्रांती ही मर्दांची असते. आता तुम्ही मुडदे आहात का मर्द आहात ते ठरवा. आमचे त्यांना आव्हान आहे, तुमच्या यंत्रणा हटवा आणि ईव्हीएमशिवाय मैदानात या, बघू 400 पार होतात की 400 मतेही मिळत नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. जय शिवाजी, जय भवानी हा नारा असा द्या की दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले पाहिजे, असे ते म्हणाले.