नार्कोटिक्सचे आणखी तीन तोतया अधिकारी जेरबंद, व्यावसायिकाचे अपहरण करून उकळली खंडणी

वर्सोवा येथील रेस्टॉरंटमधून एका व्यावसायिकाला अमली पदार्थविरोधी कक्षाचे अधिकारी असल्याचे सांगत त्याचे अपहरण केल्यानंतर त्याच्याकडून खंडणी उकळणाऱया टोळीतल्या आणखी तिघा सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने मुसक्या आवळल्या. दोन दिवसांपूर्वी सहा जणांच्या टोळीच्या म्होरक्याला बेडय़ा ठोकल्या होत्या.

कमल (नाव बदललेले) हे व्यावसायिक 30 तारखेला वर्सोवा येथील एका हॉटेलात गेले होते. तेथे सहा जणांनी त्यांना हेरल आणि अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटचे पोलीस अधिकारी असल्याची ओळख सांगत सोबत येण्यास सांगितले. मग 50 लाख दे नाहीतर ड्रग्जच्या गुह्यात अडकवू, असे धमकावले. दरम्यान, आरोपींनी किरण यांच्याकडून साडेपाच लाख, एक मोबाईल फोन घेतला आणि किरण यांना जाऊ दिले होते. त्यानंतर किरण यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-9 ने समांतर तपास सुरू केला. सह आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली व युनिट प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सचिन पुराणिक, सपोनि उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, स्नेहल पाटील तसेच कोळी, महेश मोहिते, शार्दुल बनसोडे, प्रशांत भुमकर या पथकाने झटपट कारवाई करत या गुह्यातील मुख्य आरोपी दीपक जाधव याला गोरेगाव येथील एका डॉमेंट्रीमधून उचलला. दीपकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांची नावे पुढे आली. त्यानुसार दया नायक यांनी दीपकचे अन्य तिघे साथीदार दिलीप मंजुलकर (46), रुस्तम शहा (32) आणि सचिन मल्होत्रा अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या. गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम येथे तिघेही सापडले. डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुह्यात मल्होत्रा वॉण्टेड होता.