कशाला वारंवार तोंड काळं करून घेतोस? मिटकरींकडून नीलेश राणेंचा समाचार, ट्विटरवर रंगलं युद्ध

amol-mitkari-nilesh-rane

अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा एक गट भाजप-मिंधेसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यात कमालीचा गोंधळ माजला आहे. त्यातच कधीही एकमेकांसोबत न राहिलेले नेते एकमेकांसोबत आल्याने त्यांच्यात वादावादी, कुरघोडी असे प्रकार सुरू झाले आहेत. पक्ष सोबत येऊन देखील नेते एकमेकांच्या जवळ आलेले नाहीत असंच सध्या दिसत आहे. अजित पवारांचे सहकारी अमोल मिटकरी यांच्या एका विधानानंतर त्या विधानाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केला. मात्र मिटकरी यांनीही नीलेश राणेंचा समाचार घेत शाब्दिक उद्धार केला. आता महायुतीची सत्ता असेपर्यंत हे प्रकार चालतच राहतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

मी अजित पवार यांच्यासोबत आहे. भाजपचा प्रचार करणार नाही, अशा आशयाचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं होतं. नीलेश राणे यांनी त्याचा आधार घेत ट्विट करत मिटकरी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘आताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही… हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात….’ असं नीलेश राणेंच्या ट्विट मध्ये म्हटलं.

त्याला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शाब्दिक जोड्यांनी हाणलं. ‘अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा.. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवार तोंड काळं करून घेतोस?’, असं मिटकरींनी सुनावलं. आता महायुतीची सत्ता असेपर्यंत हे प्रकार चालतच राहतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.