नीलक्रांती चौकात दोन गटांत राडा; 35 जणांवर गुन्हा

दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी (दि.12) रात्री या चौकात कार्यक्रमादरम्यान गाणे लावण्यावरून वाद झाला. यावेळी दोन गट आपसात भिडले. दांडके, कोयत्याने परस्परांवर वार करण्यात आले. यावेळी तोडफोड करून खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यात चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांच्या 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली व तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल अजय साळवे (रा. बालिकाश्रम रोड, नीलक्रांती चौक, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शुक्रवारी रात्री नीलक्रांती चौकात भीमगितांचा कार्यक्रम सुरू असताना, सनी कांबळे, अंकुश कांबळे, सागर रोकडे, गौरव गायकवाड, अमोल गायकवाड, प्रतीक बारस्कर, अभी लोणारे, आकाश कांबळे यांच्या सांगण्यावरून विजय पठारे, राहुल झेंडे, रोहित कुचेकर, करण पाचारणे, सनी राजेंद्र पाथरे, सुमीत विजय शिंदे, अद्वैत दिनेश शिंदे, राज चावरे (सर्व रा. सिद्धार्थनगर, नगर) हे तेथे आले. स्टेजवर हातात पाईप, लाकडी दांडके व चाकू घेऊन येऊन आमचे लहुजींचे गाणे लावा, असे म्हणून शिवीगाळ करीत विजय पठारे याने हातातील चाकूने मला आणि एकनाथ गायकवाड, प्रतीक शिंदे यांना जखमी केले. तसेच इतरांनी दहशत निर्माण करून शिवीगाळ करत दमदाटी केली, असे फिर्यादीत
म्हटले आहे.

विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर, नगर) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, दि. 12 रोजी रात्री नीलक्रांती चौक येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील स्टेजवर गेलो असता, तेथे महापुरुषांचे फोटो खुर्चीवर पूजनाकरिता ठेवलेले होते. त्यामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा फोटो न दिसल्याने, त्यांचा फोटो का ठेवला नाही, अशी अजय साळवे यांना विचारणा केली. यावेळी अजय साळवे याच्या मुलाने मला स्टेजवरून खाली ओढून हातातील तलवारीच्या उलटय़ा बाजूने मारहाण केली. तसेच गौरव साळवे याने चॉपरने माझ्यावर वार केला. तसेच येथे उपस्थित असलेले अजय साळवे, भप्या भोसले, बुग्गा ऊर्फ रूपेश तुळशीराम गायकवाड व इतर सात ते आठ अनोळखी (सर्व रा. नीलक्रांती चौक, नगर) यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

ह नगरमधील नीलक्रांती चौकातील भीम महोत्सवात शुक्रवारी रात्री झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून अधिकाऱयांना सूचना दिल्या.